छ.शिवाजी महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूर प्रकरणाची सखोल चौकशी करा: खा. उदयनराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्याविषयी आणि देशाविषयी आक्षेपार्ह मजकूर व पोस्ट करणाऱ्या क्लिपशी संबंधीत सर्वांनाच ताब्यात घेवून चौकशी करा. तसेच अशी कारवाई करा की पुन्हा असे करण्याची कोणाची हिमंत झाली नाही पाहिजे अशा संतप्त भावना व्यक्त करत खा. उदयनराजे भोसले यांनी छ. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा, अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे, अन्यथा माणसे पेटून उठतील, असा इशाराही दिला.

१५ ऑगस्ट रोजी देश तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रदर्शित करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर साताऱ्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. याबाबत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत तणाव वाढू न देता पोस्ट करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरु असतानाच श्री.छ.खा. उदयनराजे भोसले यांच्यासह साताऱ्यातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेत त्यांना निवेदन देवून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, विनीत पाटील, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, गीतांजली कदम, पंकज चव्हाण,ॲड. वर्षाताई देशपांडे, गणेश भिसे, विजय मांडके तसेच विविध सामजिक संघटनांचे प्रतिनिधी , कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस अधीक्षकांच्या दालनात बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, यापूर्वी देखील अपवादात्मक असे काही प्रकार घडले आहेत. काही प्रवृत्ती या अशा प्रकारे छ. शिवाजी महाराजांची बदनामी करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम असतात. वास्तविक अशा व्यक्तींना जगण्याचा अधिकारच नाही. यामुळे जाती, धर्मात तेढ निर्माण होते. या अशा सामाजिक शांतता नष्ट करणाऱ्या अशा प्रवृत्ती व त्यांच्यामागील मेंदू शोधून या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. घटना घडून चार ते पाच दिवस झालेत. आता नागरिक विचारत आहेत असे कृत्य करणाऱ्यावर काय कारवाई झाली. त्यामुळे नागरिकांच्या मर्यादेचा अंत पाहू नका.

यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संबंधित संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून तपास सुरु आहे. तसेच पाकिस्तानमधून फोन आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्याबाबत गांभीर्याने पावले उचलत पोलीस प्रशासनाकडून देशपातळीवरील तपास यंत्रणांना याबाबत कळवण्यात आलेले असून त्याचाही तपास सुरु आहे. या प्रकारात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील तरुणाई व्यसनाधिन होत असल्याच्या प्रकाराबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य वापरल्याप्रकरणी या एका मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणाचे मास्टर माइंड शोधून काढले जातील,सायबर क्राईमद्वारे याचा सखोल तपास करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.सदरचे कृत्य लांच्छनास्पद असून माफीला पात्र नाही सामाजिक सलोखा राखण्यात अग्रेसर असणाऱ्या साताऱ्यात असे दुर्दैवी प्रकार होत असेल तर ते क्लेशदायक आहे .सामाजिक स्वास्थ्य घडवून करण्याचे मोठे कारस्थान या घटनेच्या पाठीमागे असून या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करणे गरजेचे आहे.

आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जिल्ह्याच्या सामाजिक धार्मिक एकात्मतेला धक्का लागू नये यासाठी तत्पर आहोत जिल्हा प्रशासनाने अशा प्रवृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी आलेल्या युवकांना पाकिस्तानमधून धमकीचे मेसेज आले. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये काय लागेबांधे आहेत. याचाही तपास होणे गरजेचे असून या घटनेच्या मुळाशी असणाऱ्या प्रवृत्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. विलासपूर भागात ज्यांनी अशा पोस्ट केल्या त्यांच्यासाठी गाड्या संरक्षणासाठी उभ्या करण्यात आल्या आहेत . परंतु धमकीचे मेसेज ज्यांना आले त्यांना कसले संरक्षण दिलेले नाही हा मोठा विरोधाभास आहे. त्याबाबतचा तपास कोणत्या पद्धतीने होत आहे याचा खुलासा तात्काळ व्हावा, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांना भेटून आल्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकाराबाबत प्रचंड संतप्त भावना व्यक्त केली. मी देव पाहिला नाही पण शिवाजी महाराजांच्या रूपाने देव कसा असू शकतो हे नक्की कळले. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत. त्यांच्याविषयी बदनामीकारक कृत्य करणाऱ्यांना जगण्याचा अधिकारच नाही. या प्रकरणात कोणी कोणत्याही जाती धर्मातील असो.असे कृत्य करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.सामाजिक शांतता नष्ट करु पाहणाऱ्या समाज कंटकांच्या कृत्याचा गैरफायदा इतर काही प्रवृत्ती अशा प्रकारात घेत असतात. मात्र, या प्रकरणात अशी कारवाई करा की यापुढे कोणाची असे करण्याची हिमंतच झाली नाही पाहिजे.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला या सर्व प्रकरणात काय झाले याची माहिती असणार आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जे दोषी असतील त्या सर्वांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी करा, यातील नेमके सत्य काय आहे हे समाजासमोर आले पाहिजे, अशी मागणी आपण पोलीस अधीक्षकांकडे केली असून त्यांनी याबाबत कारवाई करण्याची ठोस आश्वासन दिले असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.

error: Content is protected !!