श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांचे निधन

सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचे वृद्धापकाळाने आज (दि.१३) निधन झाले. पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज सायंकाळी ५.४५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशीरा त्यांचे पार्थिव साताऱ्यातील त्यांच्या घरी अदालतवाड्यात आणण्यात येणार असून बुधवारी अंत्यविधी होणार आहे.सकाळी ९ वाजता अंत्यदर्शन व १ वाजता अदालत वाड्यापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ रोजी झाला. सातारा शहराच्या विकासात त्यांनी मोलाची भर घातली. कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. १९८५ ते १९९१ या कालावधीत ते सातारचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या काळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. शहराच्या सुधारणांसाठी ते कायम आग्रही राहिले.

सातारच्या राजघराण्यातील खा.उदयनराजे व आ.शिवेंद्रसिंहराजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला हे सातारकर कधीच विसरू शकत नाहीत.त्यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती. त्यामुळेच ते महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष होते.तसेच अक्कलकोटच्या स्वामी समर्थ ट्रस्टचे ते विश्वस्त होते.त्यांनी शिक्षण क्षेत्रातही फार मोठे योगदान दिले असून परळी खोऱ्यातील आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते, त्या माध्यमांतून शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उभारणी केली. कला वाणिज्य महाविद्यालयाच्या उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान दिले होते. करंजे येथील सेवाधाम अग्नि मंदिर संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. शांत, संयमी, आणि सुसंस्कृत ही शिवाजीराजे यांची ओळख होती. ते अतिशय साधेपणाने जीवन जगले, तळागळातल्या सामान्य माणसांशी ते प्रेमाणे वागत , प्रत्येकाला नावानिशी ओळखायचे ही त्यांची वेगळी ओळख होती. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी मित्र परिवार जपला होता. अनेकानां सामाजिक आणि राजकिय सर्वोच्च पदावर नेण्याची भूमिका त्यांनी बजावली होती.

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे गेले ७५ वर्ष साताऱ्यातील अदालतवाडा येथे राहत होते. तो अदालत वाडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्याय-निवाडा करणारा वाडा म्हणून सुपरिचित होता व आज देखील आहे. आजही या वाड्यातून दिलेला शब्द अथवा आदेश हा सातारकर सन्मानपूर्वक अंतिम म्हणतात.अशा या सर्वसामान्यांच्या लोकप्रिय राजाला म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना भूमिशिल्प परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली..!

आमचे सख्खे चुलते,आमच्या वडीलानंतर आम्हास वडील असलेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या दुःखद निधनामुळे व्यक्तिशः आमची व राजघराण्याची अतोनात हानी झाली आहे.त्यांच्या जाण्याने एक संयमी नेतृत्व हरपले आहे. सलग साडेसहा वर्षे सातारा नगरीचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या आमच्या काकांचा अनेकांना असलेला भरभक्कम आधार निखळला गेला.आमच्या भगिनी वृषालीराजे यांचे पितृछत्र काळाने हिरावून घेतले असले तरी त्यांच्या पुढील सामाजिक, कौटुंबिक कार्यात दुःखाला आवर घालुन बंधू म्हणून आलेली जबाबदारी आम्ही निश्चितच पार पाडू. कालाय तस्मै नमः

– श्री.छ.खा. उदयनराजे भोसले.

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज हे आमच्या कुटुंबातील जेष्ठ आणि आदर्श व्यक्ती होते. त्यांनी सातारा पालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही चांगले काम करून एक आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून मी एका चांगल्या मार्गदर्शकाला मुकलो आहे. त्यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. ते कायम त्यांच्या कार्यामुळे आपल्यात राहतील. आई भवानी त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.

श्री.छ.आ.शिवेद्रसिंहराजे भोसले

error: Content is protected !!