सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – भक्ती शक्तींचा संगम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी पादुका सोहळा गेली सात वर्ष किल्ले रायगड ते पंढरपूर असा करण्यात येतो. यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत हा पाळखी सोहळा पंढरपूरात एकादशीला पोहचला. तेथून पुन्हा परतीच्या मार्गावर असताना बुधवारी साताऱयात पोहचला. साताऱयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांची आणि छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीची भेट झाली. शिवतीर्थावर पालखीचे स्वागत करुन विधीवत पूजन करुन पुढे किल्ले रायगडच्या दिशेने पादुका रवाना झाल्या.
गेल्या सात वर्षापासून दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरुन पंढरपूरला पायी पालखी सोहळा काढण्यात येतो. गतवर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा सर्व नियम पाळून काढला जातो. यावर्षीही किल्ले रायगडावरुन छ.शिवाजी महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान चतुर्थीला पंढरपूरच्या दिशेने झाले. एकादशीला पादुका पंढरपुरात पोहचल्या. तेथे भक्ती आणि शक्तींचा संगम झाल्यानंतर पुन्हा परतीच्या वाटेवर असताना महापुरामुळे थोडासा पालखी सोहळयास विलंब झाला.
हा पायी पालखी सोहळा सरसेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती प्रतापराव गुजर, सनसेनापती बाळाजीराव घोरपडे, सरसेनापती संताजीराव घोरपडे, सरसेनापती धनाजीराव जाधव, रणवीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधींची भेट घेवून राजधानी साताऱयात बुधवारी पोहचला. सकाळी छत्रपती शाहु महाराजांची समाधीस्थळी भेट छत्रपतींच्या पादुकांची भेट झाली. तेथे संगममाहुलीत छत्रपतींच्या पादुकांचे स्वागत संगममाहुलीचे उपसरपंच अविनाश कोळपे यांनी केले. तेथून पोवई नाका येथे या पादुका पोहचल्यावर जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात स्वागत करण्यात आले. जायंट्स ग्रुपचे ऍड. नितीन शिंगटे, मनोज देशमुख, अध्यक्ष यशवंत गायकवाड, उपाध्यक्ष रवीराज गायकवाड, राजेंद्र माने, भारत कुचेकर, शिवभक्त अद्वैत प्रभावळकर, स्मितल प्रभावळकर, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर यांनी स्वागत केले. संदीप मंहिद गुरुजींनी शिवपादुकांचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अविभादन करुन प्रदक्षिणा घालून पुढे रायगडाच्या दिशेने या पादुका रवाना झाल्या. या पादुका रायगडावरुन पुन्हा शिवनेरीकडे जाणार आहेत.
You must be logged in to post a comment.