सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,उपजिविकेच्या पर्यायांमध्ये विविधता उपलब्ध करुन देण्यात यावी. यामध्ये कृषी, वन, पशुधन, पर्यटन, पाणी आणि स्वच्छता याचा समावेश करावा. रस्ते जोडणी आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी. ऑनलाईन सेवांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हीटी विकसीत करावी. तसेच स्थानिकांचा कौशल्य विकास आणि क्षमतावर्धन करावे. कांदाटी खोऱ्यात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना योग्य संधी उपलब्ध करुन द्यावी.

शासकीय व्यवस्था आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून पर्यावरणपूरक शाश्वत आणि एकात्मिक विकासासाठी सक्षम लोकसमुदाय तयार करावा.पर्यटनवाढीसाठी ठिकठिकाणी होम स्टेची व्यवस्था विकसित करावी.कोयना जलाशयाच्याकाठी टेन्ट व कॉटेज सारखी व्यवस्था निर्माण करावी. नौका पर्यटन आणि जंगल मुक्कामासह ट्रेकिंगची सोय उपलब्ध करुन द्यावी. पशुधनावर आधारित शेतकरी उत्पादक संघटना विकसित करुन त्यांचा बिझनेस प्लॅन तयार करावा. मध गोळा करणे, त्या वरील प्रक्रिया आणि विक्री यासाठी व्यवसाय योजना तयार करावी.तापोळा, महाबळेश्वर, खेड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा तसेच जलवाहतुकीमध्ये सुधारणा करण्यात यावी. तसेच कांदाटी खोऱ्यातील सोळा गावांसाठी सक्षम अशी आरोग्य सुविधा निर्माण करावी.पुस्तकाचं गाव भिलार ब वर्ग पर्यटन दर्जा मिळणेबाबत, कास पुष्पपठार येथील रस्ते विकास व परिसर निसर्ग पर्यटन आराखडा तयार करावा, किल्ले प्रतापगड संवर्धन व विकास कामे , किल्ले प्रतापगड पायथा येथे शिवप्रतापसृष्टी उभारणे, सातारा जिल्ह्यातील 26 पर्यटन स्थळांचा व शहिद तुकाराम ओंबाळे यांच्या जन्मगावी स्मारक उभारणे या विषयांचाही आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला.

पोलीस विभाग आढावा

राज्य शासनाने पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर दिला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाणे, अत्याधुनिक यंत्रणा, निवासस्थाने यासह इतर सुविधा देण्यात येणार असून, पोलीस विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही,अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!