सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. 10 नजीक संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्यात पडून एका चार वर्षीय लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी 8 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विराट विजय चव्हाण (वय 4 रा. बुधवार पेठ, कराड) असे खड्यात पडून मृत्यू झालेल्या लहान मुलांचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शहरातील बुधवार पेठेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्यासमोर नगरपालिका शाळा क्र. 10 च्या बाजूला सध्या संरक्षक भिंतीत उभारण्याचे काम सुरू होते. त्यासाठी सदर ठिकाणी मोठे खड्डा खणले असून त्यामध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, बुधवारी 8 रोजी सायंकाळी या परिसरात काही लहान मुले खेळत होती. थोड्या वेळाने त्यातील एक लहान मुलगा गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध केली. परंतु, तो मिळून आला नाही. त्यानंतर काही वेळाने शोध घेतला. यावेळी सदर ठिकाणी खोदलेल्या खड्यात पाहिले असता तो लहान मुलगा खड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याला खड्याबाहेर काढले असता तो मृत झाला असल्याचे दिसून आले. तयानंतर त्याच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. दरम्यान, ही घटना समजताच नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी, घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. मृत लहान मुलाच्या कुटुंबियांसह नागरिकांनी या अक्षम्य गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
You must be logged in to post a comment.