कऱ्हाड पोलीस निरीक्षकांच्या कक्षातच युवकावर चाकूने वार

(सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा) : अदखलपात्र गुन्ह्याच्या चौकशीकामी पोलीस ठाण्यात आणलेल्या आरोपीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच फिर्यादीवर चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये फिर्यादी युवक गंभीर जखमी झाला. पोलीस निरीक्षकांनी तातडीने झडप घालून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. येथील शहर पोलीस ठाण्यात सोमवारी ही दुपारी घटना घडली.

किशोर पांडुरंग शिखरे (२७, रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) असे चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी लखन भागवत माने (४०, रा. हजारमाची) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील लखन माने व किशोर शिखरे यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. त्या वादाच्या कारणावरून किशोरला घाबरून लखन हा पंढरपूरमध्ये राहण्यास गेला होता. त्याठिकाणी विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना गोपीचंद टिळा लावण्याचे काम तो करीत होता. किशोर शिखरेच्या वडिलांशी लखनचे नेहमी फोनवरून बोलणे होत होते. किशोरला ते मान्य नव्हते. माझ्या वडिलांशी बोलू नकोस, असे तो लखनला सांगत होता. त्यावरूनही त्यांच्यात वाद झाला होता. त्यातच लखनने २५ फेब्रुवारी रोजी दुपारी किशोरला फोन करून ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत किशोरने कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून लखन माने याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद झाला होता. सोमवारी या गुन्ह्यात चौकशीकामी लखन व किशोरला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास किशोर शिखरे पोलीस ठाण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी त्यांच्या कक्षात त्याचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर अर्ध्या तासाने लखन माने त्याठिकाणी आला. चौकशीकामी निरीक्षक पाटील यांनी त्यालाही कक्षात बोलवले. मात्र, कक्षात जाताच लखनने स्वत:जवळ असलेल्या चाकूने किशोरवर सपासप वार केले. हे वार किशोरच्या पाठीत, मानेवर आणि हातावर बसले. क्षणात घडलेल्या या घटनेमुळे पोलीसही हादरले. वरिष्ठ निरीक्षक पाटील यांनी तातडीने लखन मानेला पकडले. तसेच जखमी किशोर शिखरेला उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

error: Content is protected !!