नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; आवश्यकतेनुसार तातडीचे स्थलांतर करावे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि आवश्यकता भासल्यास तात्काळ स्थलांतर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यातील धरणांमधून वाढीव विसर्ग सुरू असल्याने नदीकाठची गावे, दरडप्रवण क्षेत्र तसेच पूल-पाणथळ भागात सतर्कता बाळगावी. ज्या पुलांवर पाणी आले आहे ते तातडीने वाहतुकीस बंद करून पर्यायी मार्गावर वळवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाबळेश्वर, पाटण, जावली या भागात अतिवृष्टीचा जोर कायम असून, कोयना धरणातून एक लाख क्युसेक पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी बाधित कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करून त्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात, असा आदेश त्यांनी दिला.

दरम्यान, आतापर्यंत वाईतील ४० कुटुंबे, कराड व पाटण शहरातील शेकडो नागरिक, तसेच तांबवे व महाबळेश्वर तालुक्यातील अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बोटी व आपत्कालीन साहित्य विविध तालुक्यांत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना 24×7 मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय मदत, औषधसाठा, सर्पदंशावरील लस यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासोबतच धबधबे व पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

error: Content is protected !!