सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : अवयवदान ही एक काळाची गरज आहे. किडनी, डोळे या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे.कोणत्याही दानापेक्षा अवयवदान हे पवित्र दान आहे. प्रत्येकाने अवयवदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून अवयव दान ही लोक चळवळ झाली पाहिजे यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.
नेत्रदान पंधरवड्यानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालय व इनरव्हील क्लब ऑफ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने अवयव दान जनजागृतीसाठी महिला दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आयोजित दुचाकी रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ.राहूल जाधव, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत काटकर, कान नाक घसा तज्ञ डॉ.सुभाष कदम, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा निना महाजन, कोमल न्यू लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गोडसे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर्स,कर्मचारी उपस्थित होते.
अवयव दान ही लोक चळवळ झाली पाहिजे, असे सांगून डॉ. करपे म्हणाले, अवयव दानासाठी नागरिकांनी पुढे यावे. एका व्यक्तीने नेत्र दान केले तर दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. ज्या प्रमाणात अंध व्यक्तींची संख्या आहे त्या प्रमाणात नेत्र उपलब्ध होत नाही. मृत व्यक्तीने जर नेत्र दानाची नोंद केली नसेल तर त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीनेही नेत्र दान करता येते. यासाठी जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ही महिलांची दुचाकी रॅली स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय येथून पोवई नाक्यावरून खालच्या रस्त्याने मोती चौक अशी जावून वरच्या राजपथ मार्गे पोवई नाका येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी रॅलीत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.सहभागी महिलांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
You must be logged in to post a comment.