वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करावे :ना. शंभूराज देसाई

सातारा , (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा वासियांनी शासनाने तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा तसेच अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये,असे आवाहन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
मॉल, मार्केटमध्ये गर्दी दिसत आहे, अशा ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देवून श्री. देसाई पुढे म्हणाले, कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत त्याचबरोबर टेस्टींगचे प्रमाणही वाढविले आहे. पोलीस विभाग व नगर परिषदेला विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर रात्री पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविण्याबाबतही पोलीस विभागाला सांगण्यात आले आहे.
जिल्हावासियांनी कठोर उपाययोजना करण्याची वेळ आणू नये शासनाने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन मास्कचा वापर, सुरक्षित अतर व वेळोवेळी सॅनिटाझरचा वापर करावा, असेही आवाहन गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.

error: Content is protected !!