सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाधित महिलांची यशस्वी प्रसूती

दोन्ही मातांसह बाळंसुद्धा सुखरूप, सुरक्षित आणि लक्षणं विरहित
सातारा (भूमिशिल्प वृत्तविशेष) : सातार्‍यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करून त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करणारं शासकीय रुग्णालय. गंभीर अपघातापासून अवघडातल्या अवघड शस्त्रक्रिया करून रुग्णांना नवसंजीवनी देण्याचं काम येथील तज्ज्ञ डॉक्टर्स अहोरात्र करत असतात. सध्या कोरोनाबाधितांना कोरोनामुक्त करण्याचं काम या डॉक्टरांकडून सुरू आहे. अशातच या डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल झालेल्या दोन बाधित गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती करून शासकीय रुग्णालयातील कौशल्यपूर्ण कामगिरी पुन्हा एकदा दाखवून दिली. कोरोनाबाधित गर्भवती महिलांसंदर्भात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या केल्या गेलेल्या या पहिल्याच प्रसूती ठरल्या.

गावडी (ता. जावली) आणि बनवडी (ता. माण) येथील अनुक्रमे 26 आणि 25 वर्षीय दोन कोरोनाबाधित महिला क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झाल्या. या दोन्ही माता आणि त्यांची बाळं सुरक्षित, सुखरूप आणि लक्षणं विरहित आहेत.
गावडी येथील 26 वर्षीय गर्भवती महिला 29 मे रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. 30 मे रोजी या महिलेचा नमुने अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्याचदिवशी ती प्रसूत झाली. मात्र तिने जन्म दिलेल्या बाळामध्ये कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. आज तिचा आणि तिच्या बाळाचा नमुने अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ती कोरोनामुक्त झाल्याचे आणि तिचे बाळही सुखरूप असल्याचे समोर आले. आज गुरुवार या दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, बनवडी येथील 25 वर्षीय गर्भवती महिला 9 जून रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. मागील महिन्यात माण तालुक्यातील बनवडी हे गाव कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या गर्भवती महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना फलटण कोरोना केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. 8 जून रोजी या महिलेचा नमुने अहवाल पॉझिटिव्ह आला. 10 जून रोजी ही महिला प्रसूत झाली असून ती कोरोनाबाधित असली तरीही तिची आणि तिच्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दोन्ही बाधित महिलांची सुरक्षित प्रसूती
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुनिल सोनवणे (वर्ग 1) यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एस. पी. देसाई, डॉ. दत्तात्रेय पाटील यांनी या दोन्ही महिलांची सुरक्षित प्रसूती केली. यावेळी त्यांना आरोग्यसेविका पोतदार आणि इतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सुरक्षितता म्हणून सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेविकांनी पीपीई किट परिधान करून व इतर सर्व नियम पाळून या प्रसूती यशस्वी करून दाखवल्या.
कोरोनाकाळात ’सिव्हिल’कडून उत्तम कामगिरी
सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व आरोग्य सेवक गेली अडीच-तीन महिन्यांपासून ’कोरोना योद्धा’ बनून लढत आहेत. रुग्णालयात आजअखेर 218 जण कोरोनाबाधित म्हणून उपचारार्थ दाखल झाले. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला तर 165 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या 41 जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 2103 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
सर्वसामान्यांच्या सुदृढ आरोग्याचा भक्कम आधार
सिव्हिल हॉस्पिटल सातारकरांच्या सुदृढ आरोग्याची नवी ओळख बनत चाललंय. या ठिकाणी नेमणुकीस असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक-सेविका, कर्मचारी वर्ग उत्तम सेवा करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे रुग्णालय उत्तम काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया काही सातारकरांनी व्यक्त केली.




error: Content is protected !!