सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात शौचालय, पिण्याचे पाणी आणि इतर मुलभूत सोयीसुविधा नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याची जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी,अन्यथा रिपाइं (A) यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंने जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर अडागळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासकीय रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. तसेच रुग्णालयाच्या आवारात स्वच्छ पिण्याचे पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे. अपंगांसाठी अपंगत्व दाखला व फिटनेस सर्टिफिकेट देत असताना अडवणूक केली जात आहे. तरी या प्रश्नांवर गांभार्याने दखल घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली असून जर दखल घेतली नाही तर जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशाराही रिपाइंच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदन देताना रिपाइंचे संजय भिसे, सुनील मेळाट, बापू आवळे, अजित नलावडे, निलेश भंडारे व कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.