जिल्हा रुग्णालयासमोरील अतिक्रमणांवर हातोडा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या व टपऱ्यांची रांग बुधवारी सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आली. प्राप्त तक्रारींची पालिकेने तातडीने दखल घेतल्याने रुग्णालय परिसराने मोकळा श्वास घेतला.

जिल्हा रूग्णालयात जिल्हयाच्या खेड्यापाड्यातून  शेकडो रूग्ण उपचारासाठी येत असतात. सध्या कोरोना  चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे परिसरात शांतता टिकून राहणे गरजेचे आहे. परंतु वाढते अतिक्रमण, हातगाडीधारकांमध्ये होणारे वादावादीचे प्रकार, वाहतुकीची कोंडी अशा गोंगाटामुळे जिल्हा रुग्णालयाची शांतता सातत्याने भंग होत आहे. रूग्णालयाच्या संरक्षक भिंती बाहेर खाद्यपदार्थ, फळ, नारळपाणी विक्रेत्यांनी आपले गाडे लावले आहेत. त्याच्या शेजारी चहा, वडापाव, भजी विक्रेत्यांनीही गर्दी केल्यामुळे येथील अतिक्रमणांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. दोनच दिवसांपूर्वी येथील दोन फळविक्रेत्यांमध्ये मोठी वादावादी झाली होती. त्यामुळे वादातून शांतता भंग करणारी व वाहतुकीला अडथळ ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेने कारवाई करावी, अशा तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींनुसार बुधवारी दुपारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने जिल्हा रुग्णालयाचा संरक्षण भिंती बाहेरील सर्व हातगाड्या व टपऱ्या काढून टाकल्या. कारवाईच्या भीतीने काही जणांनी आपल्या गाड्या स्वतःहून हटविल्या. अनेक महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयाचा परिसर मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!