जिल्हा बॅंक, कृष्णा, किसनवीर कारखान्याची निवडणूक

मुंबई : जिल्हा मध्यवर्ती बँका, साखर कारखान्यांसह ४७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सुकर झाला आहे. गळीत हंगामामुळे सहकारी मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तीन महिन्यांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर आणलेली स्थगिती सरकारने पुन्हा मागे घेतली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, कृष्णा व किसनवीर सहकारी साखर कारखान्यांसह विविध सुतगिरण्यांच्या निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. या निवडणुकीत भाजप विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत पहावयास मिळणार आहे.

राज्यातील ४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. निवडणुकीला ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती मागे घेण्यात आली आहे. सहकार विभागाने आता निवडणुकीला परवानगी दिल्यानंतर त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला. पण जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच साखर कारखान्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होताच, ऊस गाळप हंगाम पूर्ण होईपर्यंत या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर १६ जानेवारीला निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली.

राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा  अ वर्गातील ११६ मोठय़ा सहकारी संस्था, सहकारी नागरी बँका, क्रेडिट सोसायटी, कर्मचाऱ्यांच्या क्रे डिट सोसायटी अशा ब वर्गातील मध्यम स्वरूपाच्या १३ हजार ८५, छोटय़ा क्रेडिट सोसायटी, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा क वर्गातील १३ हजार ७४ आणि ग्राहक संस्था, कामगार संस्था अशा ड वर्गातील २१ हजार संस्था यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. राज्यात आता कोरोनाची स्थितीही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग ही मोकळा होणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर राष्ट्रवादीचे सत्ता आहे. यामध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अध्यक्ष आहेत. तर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे संचालक आहेत. यंदा भाजपकडून स्वतंत्र पॅनेल टाकण्याची चर्चा सुरु आहे. यासाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जयकुमार गोरे, अतुल भोसले, मदन भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढवली जाणार आहे. तर भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यावर सध्या माजी आमदार मदन भोसले यांची सत्ता आहे. त्यांची सत्ता उलथवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व त्यांचे बंधू नितीन पाटील या दोघांनी कंबर कसली आहे. त्यांनी ताकदीने निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा कारखान्यावर भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या गटाची सत्ता आहे. येथील निवडणुक नेहमी भोसले-मोहिते गट अशी होत असते. यंदा पहिल्यांदा भाजप विरुध्द महाविकास आघाडी अशी होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीतर्फे अविनाश भोसले यांच्या नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री, उंडाळकर या तिन्ही गटांनी मोट बांधली आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये या सर्व निवडणुकींची रंगत वाढत जाणार आहे.

error: Content is protected !!