जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना पाठवले ‘ते’ साडेचारशे रुपये

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांपूर्वी वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य शासनाने मिनी लाॅकडाऊन जाहीर केला होता. शासनाच्या निर्णयाला विरोध म्हणून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावर भिक मांगो आंदोलन केले. त्यानंतर जमलेले साडेचारशे रुपये त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तेच पैसे मनिऑर्डर करून उदयनराजे भोसले यांना परत पाठवले असून उदयनराजे ही मनिऑर्डर स्वीकारणार का? हा प्रश्न सातारकरांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ‘ब्रेक दी चेन’ ची घोषणा करून विंकेड लॉकडाउन केला. या लॉकडाउनच्या विरोधात उदयनराजे भोसले यांनी रविवारी आंदोलन केलं. सातारा येथील पोवई नाका येथे झाडाखाली कटोरा घेऊन बसत भीक मांगो आंदोलन केलं होतं. त्यावेळी जमा झालेले 450 रुपये जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदारांकडे सुपूर्द केले होते.

दरम्यान,आज जिल्हाधिकारी कार्यालयातून हे पैसे पुन्हा उदयनराजे यांना मनिऑर्डरद्वारे पाठविण्यात आले. तसेच ही रोकड कायदेशीररित्या स्विकारता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनिऑर्डर सोबत पाठवलेल्या पत्रात नमूद केले असून खा.उदयनराजे मनिऑर्डर स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!