सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होऊ लागल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात मिनी लाॅकडाऊन जाहीर केले. जिल्हा प्रशासनानेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंध घातले आहेत. त्यास जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला. तसेच प्रशासनाच्या निर्णयाविरुध्द रस्त्यावर उतरले होते. यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कडक निर्बंधावर प्रशासन ठाम असून कोणत्याही प्रकारचे नियम शिथील करण्यास नकार दिला.
कोरोनामुळे राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. याला सातारा शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारी जवळपास पाऊण तास बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अत्यावश्यक सेवेच्या वेळेप्रमाणेचे इतर आस्थापनाही सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. शहरातील सर्व व्यापारी कोरोनाचे नियम पाळतील असेही सांगितले. पण, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करता येणार नाहीत. राज्याचा निर्णय असल्याने मलाही तो मागे घेता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या भावना योग्य आहेत. याबाबत राज्यस्तरावर त्या कळवू, असे सांगून व्यापारीवर्गाला आश्वस्तही केले.
सध्या सणाचे दिवस आहेत. लाखो रुपयांचा माल भरला आहे. त्यामुळे अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्याबाबत निवेदन दिले. पण, त्यांनी राज्याचा निर्णय असल्याचे सांगून तुमच्या भावना वरपर्यंत कळवू असे सांगितले. त्यामुळे आम्हाला आता योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. तसेच याबाबत आम्ही प्रशासनाबरोबरच आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.