सामुदायिक अग्निहोत्र मानसिक शांततेसाठी उपयुक्त : राजाभाऊ महाराज

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): विश्वात अनेक देश आहेत, प्रत्येक देशाच्या, तेथील लोकांच्या समस्या वेगवेगळया आहेत परंतु गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे संपूर्ण जग एकाच चिंतेने ग्रासले गेले आहे. शाश्वती नसणा-या या आताच्या काळात अग्निहोत्राचे महत्व शांतता, समाधान आणि मानसिक सुख जगभऱामध्ये पोहचण्यास मदत झाली. सामुदायिक अग्निहोत्र हे मानसिक शांततेसाठी उपयुक्त असल्याचे मत प.पू. डॉ. पुरुषोत्तमजी राजीमवाले ऊर्फ राजाभाऊ महाराज (परम सद्गुरु श्री गजानन महाराज अक्कलकोट यांचे नातू) श्री. बाळाप्पा महाराज मठ, गुरुमंदिर व अध्यक्ष विश्व फौंडेशन शिवपुरी अक्कलकोट यांनी व्यक्त केले.

श्री.छ.प्रतापसिंह महाराज सेवाधामच्या माध्यमातून विश्व अग्निहोत्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक अग्निहोत्राप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री.छ. शिवाजीराजे भोसले, खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले आणि श्री.छ. वृषालीराजे भोसले उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, अग्निहोत्र यज्ञाकडे वैज्ञनिक दृष्टीकोनातून पहावे. या माध्यमातून पर्यावरण पूरक शास्त्रीय प्रयोग होत आहेत. अग्निहोत्र हा वातावरण शुध्द करण्याचा वैदिक उपाय असून यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय या पंचसाधन मार्गाच्या सिध्दांतावर आधारीत आहे. संपूर्ण मानव आणि सृष्टीच्या कल्याणासाठी परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे द्वारा कथन केला गेला आहे. 12 मार्च हा दिवस सामूहिक स्वच्छता, अन्नदान, रक्तदान, रुग्णसेवा, खाऊ वाटप, गरजूंना मदत अश्या विविध समाज उपयोगी कामे करून साजरा करण्यात येतो. नित्य अग्निहोत्र केल्याने घरातील वातावरण शुध्द, पवित्र राहते. ते सुगंधी पुष्टी तत्वाने भारले जाते. सुर्योदयाच्या अग्निहोत्राचा इष्ट परिणाम सुर्यास्तापर्यंत व सुर्यास्ताचा अग्निहोत्राचा इष्ट परिणाम सुर्योदयापर्यंत टिकून राहतो. याव्दारे अग्निहोत्रास्थानी स्वास्थ्य व कल्याणकारी चक्र कार्यरत राहते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून स्वास्थ्य लाभते. वातावरणात रोगाणूच्या वाढीस प्रतिबंध होतो. व्यसनमुक्त, चिडचिडा, हट्टी व मतिमंद मुलांवर हे फारच उपयुक्त ठरते. अग्निहोत्र आचाराने ध्यान, धारणा, योग, जप आदी कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक साधना लाभते, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या आणि अग्निहोत्रकांच्या उपस्थितीत सामुदायिक अग्निहोत्र करण्यात आले. सकाळच्या सत्रात 10 ते 2 यावेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष श्री.छ. शिवाजीराजे भोसले, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, शाहू धर्मादाय रुग्णालयाचे डॉ.मोहिते आणि विश्वस्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि अग्निहोत्रकांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!