ट्रक चालकाच्या अपघाती मृत्युप्रकरणी वारसांना 1 कोटी 15 लाखांची नुकसान भरपाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ट्रक चालकाच्या अपघाती मृत्युमुळे समोरच्या ट्रकचा मालक आणि विमा कंपनीकडून 81 लाख अधिक 7 टक्के दराने व्याज अशी एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश सातारा जिल्हा न्यायालयाने दिला आहे. दरम्यान,ही रक्कम जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संजय पवार यांनी सन 2008 मध्ये 10 चाकी कंटेनर ट्रक फायनान्स कंपनीच्या कर्जाने विकत घेतला होता. संजय हे स्वतः ट्रक चालवायचे. ते ट्रक घेऊन हायवेवरून मुंबईहून सातारकडे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने लेन सोडून संजय जात असलेल्या लेनमध्ये घुसून संजय यांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये संजय यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी त्यांच्या पत्नीने भरपाई मिळणेसाठी न्यायालयात दाद मागितली होती. दरम्यान, अपघात होईपर्यंत संजय यांनी दरमहा रुपये 35,000 इतका हप्ता वेळच्या वेळी फेडला होता. संजय यांचे कुटुंब कळंबोली, मुंबई येथे भाड्याच्या घरात राहत होते. संजय यांची मुले तेथेच शिक्षण घेत होती. या सर्व बाबींचा विचार करून संजय यांचे उत्पन्न दरमहा रुपये 66 हजार इतके होत असल्याने एकूण 1 कोटी 44 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पवार कुटुंबीयांतर्फे करण्यात आली होती.

या दाव्याच्या कामी कंटेनर ट्रकच्या कर्ज खात्याचा उतारा, ट्रकच्या मालकीचे रस्ते वाहतूक परिवहनचे (आर.टी.ओ) दाखले इत्यादी कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. हा पुरावा आणि सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिर्णय यांचा विचार करून सातारा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. पी. अभंग यांनी अंतिम निर्णय देवून वारसांना एकूण 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ही नुकसान भरपाई ट्रक चालक-मालकाच्या अपघाती मृत्यूबद्दलच्या दाव्यामध्ये आजपर्यंतच्या सातारा जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई ठरली आहे. मृत ट्रक चालक-मालक संजय सखाराम पवार (रा. परखंदी, ता. माण) यांच्या वारसांतर्फे नुकसान भरपाईच्या दाव्याचे काम अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी पाहिले.

error: Content is protected !!