शोषितांच्या चळवळीची बुलंद तोफ थंडावली

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन; आज साताऱ्यात अंत्यसंस्कार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉम्रेड अंजलीताई प्रभाकर महाबळेश्वरकर (वय ८९) यांचे रविवारी रात्री पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साताऱ्यातील डाव्या चळवळीचा लढवय्या आणि तत्वनिष्ठ आवाज हरपला आहे. माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ९ वाजता साताऱ्यातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सातारा नगर परिषदेच्या राजकारणात अंजलीताई यांनी विरोधी पक्षनेत्या म्हणून निडरपणे भूमिका बजावली. सभागृहात सत्ताधाऱ्यांना जाब विचारताना त्यांची मांडणी नेमकी, अभ्यासपूर्ण आणि तडजोड न करणारी असे. आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहणे आणि लोकहिताच्या प्रश्नांवर कोणतीही भीड न बाळगता आवाज उठवणे, ही त्यांची ओळख होती. नगरपरिषदेतील त्यांचा कार्यकाळ हा केवळ पदाचा नव्हता, तर तो साताऱ्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा काळ म्हणून ओळखला जातो.

महाबळेश्वरकर दांपत्यांनी साताऱ्यातील प्रस्थापित राजकारणाला थेट आव्हान दिले. शहरातील पाणीपुरवठा, नागरी सुविधा, झोपडपट्ट्यांचे प्रश्न, कामगारांचे हक्क आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली. शहरातील चौकाचौकांत पुठ्ठ्यांवर प्रश्न लिहून फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याची त्यांची आगळी पद्धत त्या काळात चर्चेचा विषय ठरली होती.

अंजलीताई या विविध जनसंघटनांमधूनही सक्रिय होत्या. जनवादी महिला संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, घरेलू कामगार संघटना आदी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. तसेच एसएफआय, डीवायएफआय आणि किसान सभा या संघटनांतील कार्यकर्त्यांशी त्यांचा सातत्याने संवाद असे. कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या निधनानंतरही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. साताऱ्यातील डाव्या चळवळीला बळकटी देण्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.

अंजलीताईंच्या निधनाने साताऱ्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संघर्षाची परंपरा आणि तत्वनिष्ठ राजकारणाचा वारसा त्यांनी मागे ठेवला आहे. आज संगम माहुली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून विविध राजकीय, सामाजिक व कामगार संघटनांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. शोषितांच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवणारी ही बुलंद तोफ आज शांत झाली असली, तरी त्यांच्या विचारांची ज्योत साताऱ्यात दीर्घकाळ तेवत राहणार आहे.

error: Content is protected !!