ऑलिंम्पिक स्पर्धेत निवड झालेल्या प्रविण जाधवच्या पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

सातारा , (भूमिशिल्प वृत्तसेवा) : टोकीयो ऑलिंम्पिक (२०२०) स्पर्धेकरिता धनुर्विद्या खेळाच्या भारतीय संघामध्ये सातारा जिल्ह्यातील मौजे सरडे, ता. फलटण येथील प्रविण रमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, प्रवीण जाधव यांनी आपल्या अथक परिश्रमामुळे व प्रोत्साहनामुळेच उच्चतम कामगिरी करुन जिल्ह्याचा गौरव संपूर्ण भारत देशामध्ये वाढविला असून त्यांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा करून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.

टोकीयो ऑलिंम्पिक 2020 करिता निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सेल्फी पाँईटचे उद्घाटन प्रविण जाधव यांचे पालक व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करतांना प्रवीण जाधवचे आई-वडील यावेळी.सोबत जिल्हाधिकारी शेखर सिंह.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, अध्यक्ष सातारा जिल्हा आर्चरी असो.आबासाहेब जाधव, सचिव सातारा जिल्हा आर्चरी असो. चंद्रकांत भिसे, शिक्षक विकास भुजबळ, मोहन पवार व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!