सी लिंक पद्धतीच्या पुलांच्या उभारणीने पर्यटन वाढीला चालना :आ. शिवेंद्रराजे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): बामणोली, तापोळा भागात पर्यटन वाढीसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या बामणोली- दरे आणि आपटी- तापोळा यादरम्यान सी लिंक पद्धतीचे दोन भव्य केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहेत. स्थानिकांना दळणवळणासाठी हे पूल उपयोगी पडणार असून महामार्ग क्र. ४ वरून आणि मुंबई पुण्यावरून येणारे पर्यटक पाचवड हॅममार्गे थेट या भागात येऊ शकतील आणि पुढे कोकणातही जाऊ शकतील. त्यामुळे या पुलांच्या उभारणीमुळे बामणोली भागातील पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे, असे आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून आणि पाठपुराव्यातून हे दोन पूल मंजूर झालेले आहेत. ३०० कोटी निधीचा बामणोली ते दरे असा जोडणारा ७२० मीटरचा केबल स्टे ब्रिज होणार असून बामणोली बाजूला १५० मीटर तर, दरे बाजूला ४५० मीटर पोहोच मार्ग होणार आहेत. याचा लाभ आसपासच्या सर्वच गावांना होणार आहे. याच मार्गाला महामार्गावरून पाचवड हॅम रस्ता दरे येथे जोडला जाणार आहे. त्यामुळे महामार्ग आणि पुणे, मुंबईवरून येणाऱ्या पर्यटकांना कराड वरून कोकणात जाण्याऐवजी बामणोली- दरे पुलामार्गे थेट कोकणात उतरता येणार आहे. यामुळे सहाजिकच बामणोली भागातील पर्यटन वाढणार आहे. याशिवाय पर्यटकांचा वेळ आणि इंधन बचत होणार आहे.

१५० कोटी निधीतून आपटी ते तापोळा असा ५६० मीटरचा केबल स्टे ब्रिज उभा राहणार आहे. आपटी बाजूस २०० मीटर तर, तापोळा बाजूस ३०० मीटर पोहोच रस्ते प्रस्तावित आहेत. हा पूल झाल्यानंतर आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून २५ किलोमीटर अंतराचा प्रवास वाचणार आहे.या दोन्ही पुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासंदर्भाने आ. शिवेंद्रसिंहराजेंनी आढावा बैठक घेतली. यावेळी जावली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता डी. एस. पवार, शाखा अभियंता निलेश कोहाळे, महेश कुन्हाळीकर, सेवा सल्लागार कंपनी टी. पी. एफ. कन्सल्टन्सीचे अधिकारी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह बामणोली भागातील सर्वच गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

तातडीने शासकीय सोपस्कार पूर्ण करून दोन्ही पुलांचे काम सुरु करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या.

दरम्यान, या दोन्ही पुलांच्या उभारणीमुळे या भागातील पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या भागातील रोजगार आणि व्यापार वृद्धी होईल. पर्यटकांनाही बामणोलीतून थेट कोकणात उतरता येणार आहे. महाबळेश्वर ते बामणोली असाही प्रवास कमी वेळेत करता येणार असल्याने या दोन्ही पुलांचा फायदा स्थानिकांसह पर्यटकांना होईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.

error: Content is protected !!