डोळे येण्याची लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे

सातारा , (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या लोकांना डोळे येण्याची लागण होत आहे. हा आजार गंभीर स्वरुपाचा नसून योग्य ती काळजी घेतल्यास व त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास हा आजार लगेच बरा होतो. डोळे येण्याची लक्षणें दिसल्यास स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील डोळ्याचा विभाग तसेच ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यासाठी पूर्णतः मोफत उपचार उपलब्ध असून रुग्णांनी काळजी करू नये, काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.

दरम्यान, डोळे येण्याची कारणे अनेक असली तरी अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो व्हायरसमुळे होतो. तसेच डोळे येण्याचा प्रसार हा डोळे आलेल्या व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे होतो त्याचबरोबर डोळे आलेल्या व्यक्तीचा हात रुमाल, टॉवेल, चष्मा, ब्युटी क्रीम, काजळ किंवा साबण इत्यादी वस्तुंमुळेही डोळ्यास संसर्ग होऊ शकतो.

डोळे येण्याची लक्षणे :

– डोळ्यांना सूज येणे.

– डोळ्यांमधून पाणी गळणे.

– डोळे लाल होणे.

– डोळ्यांना खाज येणे.

– पापण्या चिकटणे.

– डोळ्यातून चिकट पिवळा/पांढरा रंगाचा द्रव बाहेर येणे.

– डोळ्यांमध्ये आग होणे.

– डोकेदुखी- काना जवळचा भाग सुजणे किंवा कान दुखी.

– प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास.

अशी काळजी घ्यावी :

– डोळ्याच्या डॉक्टरांकडे डोळ्यांची तपासणी करावी.

– डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करावा.

– डोळ्यांना स्वच्छ पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळा धुवावे व स्वच्छ कपड्याने पुसावेत.

– डोळे आल्यावर सतत डोळ्यांना हात लावू नये.

– डोळे पुसण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा.

– डोळ्यांना हात लावल्यावर लगेच साबण लावून हात धुवावेत.

– साधा कोणताही पण स्वच्छ असा चष्म्याचा वापर करावा.

– धूर, हवा, लाईटचा प्रकाश यांचा सहवास टाळावा.

शाळा, कॉलेज,वसतिगृहे या संस्थात्मक ठिकाणी अशी लक्षणे अथवा साथ आली असेल तर डोळे आलेल्या व्यक्तीबाबत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन डॉ. करपे यांनी केले आहे.

error: Content is protected !!