सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सदरबझार परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे थैमान सुरू आहे. या परिसरातील जवळपास पन्नास ते साठ नागरिक सांधेदुखी, थकवा, ताप, थंडी अशा आजाराने त्रस्त असून, अनेकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे कोरोनाची धास्ती वाढत असताना साथरोगांचा फैलाव वाढू लागल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत.
सदर बझार हा साताºयातील सर्वात दाट लोकवस्तीचा झोपडपट्टी परिसर आहे. या झोपडपट्टीत सुमारे साडे चार हजार नागरिक वास्तव्य करतात. फेब्रुवारी महिन्यात सदर बझार, लक्ष्मीटेकडी येथे मोठ्या प्रमाणात डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. यानंतर हिवताप विभागाने या परिसराचा सर्व्हे करून डासांच्या अळ्या नष्ट केल्या. काही महिने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पावसाच्या तोंडावरच या परिसरात पुन्हा एकदा डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू, मलेरियासह, चिकगुनियाच्या साथीने अनेकजण आजारी पडले आहेत. अनेकजण खासगी डॉक्टर्सकडून उपचार घेत आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग आणि दुसरीकडे या साथीच्या आजारांनी सदरबझारकर सध्या हैराण झाले आहेत.या परिसरात डासांचे प्रमाण अधिक आहे. पालिकेकडून डासांची वाढ रोखण्यासाठी धूर व औषध फवारणी केली जात आहे. तसेच हिवताप विभागाच्या आरोग्य सेवकांकडूनही या भागात सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. बहुतांश नागरिकांमध्ये चिकनगुनियाची लक्षणे आढळली असून, हिवताप विभागाने त्या दृष्टीने उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे.
You must be logged in to post a comment.