सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या सर्वत्र कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, आज कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील एका मजुराने कोरोना झाल्याच्या भितीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, वडगाव हवेली येथील अनिल उत्तम चलवादे (वय ४५ ) हे काही वर्षांपासून वडगाव हवेली येथील स्टॅन्ड परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. याच परिसरात ते बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. काही दिवसांपासून किरकोळ स्वरूपात आजारी असल्याने यांनी कोविड १९ बाबत असणारी टेस्ट काल दि. २२ रोजी वडगाव हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून घेतली होती. मात्र रिपोर्ट आला नव्हता.
टेस्ट घेतल्यापासून ते, आपणास कोरोना झाला असेल या भीतीपोटी अस्वस्थ होते. सकाळी सात वाजता त्यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
You must be logged in to post a comment.