सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून बाधित रुग्णाना बेड तसेच इतर सुविधा मिळण्यास अडचण निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी रात्रीपासून लाॅकडाऊन जाहीर केले. शासनाकडून निर्बंध घालूनही नागरिक त्यांचे उल्लंघन करीत आहेत. अनेक नागरिक किराणा दुकान आणि मेडिकलमध्ये जाण्याचा बहाणा करीत गर्दी करीत आहेत. त्यामुळे सातारा, कराड, फलटण, वाई आदी शहरांमध्ये नागरिकांची भाजी खरेदीसाठीही झुंबड उडाली.
शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनंतर मलकापुरात घरातील साहित्य घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. मिळेल त्या दुकानात नागरिक पोहचल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानात एकच झूंबड उडाली. तर साताऱ्यातील राजवाडा, पोवई नाका येथे मंडई खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. तसेच बाॅम्बे रेस्टाॅरन्ट, पोवई नाका, राजवाडा, शाहू क्रिडा संकुल, देगाव फाटा आदी परिसरात पोलिसांनी बॅरिकेट् लावले होते. प्रत्येक वाहन चालकाला थांबवून त्याची चौकशी केली जात होती. मात्र, नागरिक विविध कारणे काढून तेथून जाण्याचा प्रयत्न करीत होते. अशा प्रकारे गांभीर्य नसल्यासारखे अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता.
दरम्यान, जिल्ह्यात हजारच्या पटीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे.वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता साखळी तोडण्यासाठी घातलेले निर्बंध काही बेफिकीर नागरिक पाळत नसल्याने प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली असून आता नरमाईची भूमिका न घेता कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय नागरिकांना जरब बसणार नाही हे मात्र निश्चित.
You must be logged in to post a comment.