बाधितांची संख्या 700 पार !

दिवसभरात 14 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू ; 29 कोरोनामुक्त 
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालयांतून 29 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरीही परतले. 14 पॉझिटिव्ह वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 703 झाली असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या 448 झाली आहे. 223 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 30 झाली आहे. मृत्यू पावलेल्या दोन जणांपैकी एकाचा मृत्यूपश्चात नमुने अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


दोन बाधितांचा मृत्यू, एका मृत्यू पश्चात व्यक्तीसह 14 पॉझिटिव्ह 
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथे कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी (ता. कोरेगाव) येथील 78 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला उच्च रक्तदाब व श्वसन संस्थेचा त्रास होता. दरम्यान, महाबळेवर तालुक्यातील खरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात नमुने अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या या व्यक्तीने बुधवारी पहाटेच्या सुमारास बाहेर जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू पश्चात नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तो आज गुरुवारी पॉझिटिव्ह आढळून आला.


बाधित रुग्णांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे
पाटण : उरुल येथील 26 वर्षीय पुरुष,  फलटण : वडलेे येथील 40 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 1 वर्षीय बालक, 89 व 30 वर्षीय पुरुष, बरड येथील 23 व 26 वर्षीय पुरुष, खटाव : निढळ येथील 20 वर्षीय गर्भवती महिला, महाबळेश्वर : कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुष (मृत), वाई : आसरे येथील 55 वर्षीय पुरुष, जावली : ओझरे येथील 5 वर्षांची मुलगी, 34 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय महिला. असे एकूण 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, बाहेरील जिल्ह्यातून प्रवास करून सातारा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असणार्‍या कोल्हापूर येथील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे खाजगी प्रयोगशाळेने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आणखी 29 जण कोरोनामुक्त
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 4, बेल एअर हॉस्पिटल (पाचगणी) येथील 16, कोरोना केअर सेंटर (शिरवळ) येथील 3, माण येथील 1, वाई येथील 1, रायगाव येथील 4 अशा एकूण 29 जणांना आज गुरुवारी 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. 
158 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 12, पानमळेवाडी येथील 16, शिरवळ येथील 23, कराड येथील 29, वाई येथील 48, रायगाव येथील 2, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 5, फलटण येथील 7 असे एकूण 158 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून जिल्हा रुग्णालय (सातारा) आणि एनसीसीएस (पुणे) यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


’त्या’ इसमाचा मृत्यू ’बेल एअर’मध्ये झाला नव्हता
जिल्हा माहिती कार्यालयाचा खुलासा

काल (बुधवारी) संध्याकाळी जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिल्या गेलेल्या बातमीत महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे मुंबईवरुन प्रवास करून आलेल्या 55 वर्षीय पुरुषाचा बेल एअर हॉस्पिटल (पाचगणी) येथे मृत्यू झाला या 55 वर्षीय पुरुषाचा नमुनाही तपासणीसाठी आला आहे, असा मजकूर प्रसिद्ध झालेला होता. तथापि महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार, संबंधित पुरुष खरोशी या गावचा असून तो मंगळवारी रात्री सपत्नीक मुंबईवरुन गावी आला होता. गावात त्याच्या भावाचे छोटे हॉटेल असून या ठिकाणी त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. 
पहाटेच्या सुमारास पत्नी झोपेत असताना या व्यक्तीने कक्षातून बाहेर जावून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निर्दशनास आले. मृत्यूनंतर महाबळेश्‍वर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये नेऊन त्याच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. त्यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू बेल एअर हॉस्पिटलमध्ये झाला नाही, असा खुलासा जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आला आहे.



error: Content is protected !!