सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाडेगाव ता. खंडाळा येथे असणाऱ्या मांगल्य शिक्षण संस्थेच्या समता आश्रम शाळेतील वीस विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका पशुवैद्यकीय तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता दिनांक २५ रोजी खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील काही मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये आश्रम शाळेतील बारा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर शाळेतील १३० विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये दिनांक 28 रोजी आलेल्या अहवालानुसार तीन विद्यार्थी व पाच कर्मचारी यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून या तीन दिवसात या शाळेतील वीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना बाधित झालेली सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांना याच आश्रमशाळेतील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांना कोणतीही तीव्र लक्षणे नसून लोणंद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांवर औषधोपचार करण्यात येत आहे.
दहावी व बारावीच्या परिक्षा तोंडावर आल्याने या शाळेत निवासी विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत होते. मात्र कोरोनाच्या शाळेत झालेल्या शिरकावामुळे शाळा बंद ठेऊन विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. संपूर्ण शाळा व परिसरात सोडियम हायफोक्लोराईड फवारणी करण्यात आली असून तालुक्यातील इतर शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, शाळेतील विद्यार्थ्यांचे टेम्प्रेचर चेक करावे, दररोज वर्ग सॅनिटाईज करावेत असे अवाहन करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.