बावधनची बगाड यात्रा अंगलट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यभर कोरोनाचं थैमान सुरू आहे. दररोज हजारो नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. कोरोनाचं थैमान फक्त शहरांपूरताच नाही तर ग्रामीण भागातही सुरू आहे. प्रशासनाने कडक निर्बंध घातले असताना  जमावबंदी झुगारून शुक्रवारी वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा पहाटेच्या अंधारातच पार पडली. करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८३ अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १०४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेसाठी सुमारे तीन हजार भाविक जमल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ज्याची भिती होती. नेमके तेच घडल्यास सुरुवात झाली असून बावधनमध्ये तब्बल ६३ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 
 बावधनची प्रसिद्ध अशी बगाड यात्रा दरवर्षी भरत असते. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रेला परवानगी नाकारण्यात आली होती. प्रशासनाच्या सूचनांकडे काना डोळा करीत गावकऱ्यांनी बगाड यात्रा भरवली होती.  यात्रेचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर काहींना दंड ठोठवण्यात आला होता. आता या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. ही यात्रा झाल्यापासून आतापर्यंत 6३ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. बावधनच्या बगाड यात्रेमध्ये सहभागी झालेले भाविक आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस असे एकूण 61 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. बगाडाला झालेली गर्दी पाहता कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

आजुबाजूच्या  वाड्यांमध्येही कोरोनाचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.  दरम्यान, गावकऱ्यांनी कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्याला कडाडून विरोध केला आहे. लगतच्या वाई तालूक्यातही कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी चिंतेत भर घातली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले  असून ज्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण सापडले तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. गावातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर विना कारण घऱाबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या यात्रेच्या बंदोबस्तात असणारे 8 पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस उपनिरिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे वाई तालुक्यात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!