कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी


स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपले, आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे रक्षण करावे. कोरोनाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाप्रसंगी केले.


भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय  ध्वजारोहण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.  यानंतर त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावतीने जनतेसाठी शुभसंदेशाचे वाचन केले. ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस गृह रक्षक दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण सोहळ्यास  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.
कोरोनाचे संकट आज सगळ्या जगाबरोबर आपल्या देशावर आहे. या कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद झाले यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन मध्ये टप्याटप्याने शिथीलता देवून जीनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर कोरोना संसर्गाचे रुग्ण आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले,  बहुतांश लोक कोणतेही लक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत. पण कोरोनामुळे काही जण दुर्देवाने दगावले आहेत.  मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत. 
सातारा जिल्ह्यात 22 कोविड हॉस्पीटल असून यामध्ये 981 बेड, 20 कोविड हेल्थ  सेंटर असून यामध्ये 851 बेड तर  33 कोरोना केअर सेंटर असून यामध्ये 2 हजार 650 असे एकूण 4 हजार 482 बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील एकही कोरोना बाधित रुग्ण बेड पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. कर्तव्य बजावत असताना पोलीस दलातील पोलीसांचा मृत्यु झाला होता आज त्यांच्या  कुटुंबींयाना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून कुटुंबींयांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी प्रातांधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!