जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या योध्यांचे कार्य आदर्शवत : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग हादरुन गेले आहे. अशा या भयंकर महामारीच्या काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता, स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून जनसेवेचा आदर्श घालून देणार्‍या खर्‍या कोरोना योध्यांना सलाम,अशा शब्दात आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोरोना योध्यांचा सन्मान केला.

स्व. शुक्राचार्य भिसे सोशल फाउंडेशनच्यावतीने कोरोना महामारीत निडरपणे आणि निष्ठेने कर्तव्य बजावणार्‍या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि छायाचित्रकार या कोरोना योध्यांचा सन्मान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कांबळे, श्रीकांत कांबळे, सुनील भिसे, शशिकांत वायदंडे, अजय माळवदे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोना सेंटरमधील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा बजावत आहेत. पत्रकारही आपले कर्तव्य निर्भीडपणे पार पाडत आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनीही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने मास्क वापरावा, हात वारंवार धुतले पाहिजेत आणि गरज नसेल तर घराबाहेर पडू नये आणि गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!