नगरसेवक सुहास राजेशिर्के पुन्हा गाववाल्यांच्या मदतीला..!

चिपळूण एसटी आगाराचे प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना नगरसेवक सुहास राजेशिर्के, संजय रसाळ, संजय मोहिते आदी मान्यवर.

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अतिवृष्टी होऊन आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालेल्या आपल्या मूळगावातील संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सातारचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी वेहेळे (ता. चिपळूण) येथे धाव घेतली.

अतिवृष्टीमुळे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिपळून तालुक्यातील वेहेळे येथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आज गावकऱ्यांशी चर्चा केली. मोठ्या प्रमाणात शेती, घरांचे आणि विजेचे नुकसान झाले आहे. चांगली मदत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा गावातील सर्वांनी व्यक्त केली.

“परशुरामाच्या भूमीत उडालेला हाहाकार पाहवत नाही. घामाचे सिंचन करून वाढवलेली पिके आणि काडी-काडी जमवून उभारलेले संसार मातिमोल झाले आहेत. अशा स्थितीत माझ्या आवाक्यात आहे, तेवढी मदत मी घेऊन आलो आहे,” असे त्यांनी सांगताच गावकऱ्यांना भावना अनावर झाल्या. “महापुराने होत्याचे नव्हते केले,” असे गावकरी अश्रू ढाळून सांगत होते. नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांना धीर देतानाच सुहास राजेशिर्के यांनी त्यांना शिधाचे किट, कोरडा खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. “जाळल्याशिवाय पिकणार नाही, असा परशुरामाचा कोकणभूमीला शाप असतानासुद्धा कष्टाळू कोकणी माणूस रान पिकवतो. याही संकटातून तो धीराने मार्ग काढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना राजेशिर्के यांनी गेल्याच महिन्यात मदत केली होती.

दरम्यान, एसटीच्या चिपळूण आगाराचे प्रमुख रणजित राजेशिर्के यांचा त्यांनी चिपळूणमध्ये सत्कार केला. महापुराचे पाणी एसटी आगारात शिरले असताना त्यांनी सात जणांचा जीव वाचविला होता, तसेच एसटी महामंडळाची नऊ लाखांची रोकड घेऊन ते इतरांसह नऊ तास एसटीच्या टपावर बसून राहिले. जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावल्याबद्दल सुहास राजेशिर्के यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी संजय रसाळ, संजय मोहिते, सचिन साळवी, शशिकांत भोजने, चालक भगवान गोटमुलके यांचाही राजेशिर्के यांनी सत्कार केला.

error: Content is protected !!