सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावळी तालुक्यातील खिरखंडी येथील विद्यार्थ्यांना कोयना जलाशयात स्वत: बोट चालवत शिक्षणासाठी जावे लागते. याबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
खिरखिंडी येथील विद्यार्थिनी दररोज जीव धोक्यात घालत स्वत: बोट वल्हवत शिवसागर जलाशय पार करून शाळा गाठत असल्याची वृत्त विविध माध्यमांनी प्रसिद्ध केले. या वृतांची दखल घेत मा.उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सु-मोटो याचिका दाखल करण्याच्या सूचना करत खिरखिंडी येथील विद्यार्थिनींचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास सांगितले. त्यानुसार जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खिरखिंडीला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान, सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी येथील शाळकरी विद्यार्थ्यांना लाइफ जॅकेट पुरविले आहेत. या जॅकेटमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच प्राप्त झाले असून, दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. राजेशिर्के यांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
शासन त्यांच्या स्तरावर प्रयत्न करेल तेव्हा करेल परंतु ज्यांना शक्य आहे अशा समाज घटकांनी या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पुढे यायला हवे. अशा दुर्गम भागातील मुलांना शालेयस्तरावरील सर्व प्रकारच्या सेवासुविधा मिळायला हव्यात. सातारा जिल्हा प्रशासनाने तसेच मंत्रीमहोदयांनी याकडे माणूसकीच्या भूमिकेतून सहानुभूतीने लक्ष घालावे.मला जे शक्य आहे ते मी केले आहे. मी खूप काही वेगळे केले असे अजिबात नाही, तर माझे मी कर्तव्य पार पाडले आहे. भविष्यातही या दुर्गम भागातील मुलांच्या अडचणीच्या काळात माझी साथ कायम राहील.
– सुहास राजेशिर्के, मा. उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक, सातारा नगरपरिषद, सातारा.
You must be logged in to post a comment.