साताऱ्यात बेकायदेशीर वृक्षतोडीचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराशी नगरसेवकाची अरेरावी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यातील प्रभाग क्रमांक सात मध्ये मल्हार पेठेतल्या रस्त्यालगत लावलेल्या झाडांची कत्तल कोणतीही परवानगी न घेता नगरसेवकाकडूनच केल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद करत असताना पत्रकारासोबत उद्धट वर्तन केल्याची घटना शनिवारी दि.3 रोजी सकाळी घडली. गटरच्या कामामध्ये अडथळा ठरत नसलेल्या झाडांची कत्तल जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच नगरसेवकाने केली असून येथील बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या आणि पत्रकाराशी उद्धट वर्तन करणाऱ्या नगरसेवकासह संबंधीत ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संतोष शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सातारा शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील मल्हारपेठेत पत्रकार आणि नगरपालिकेच्या वृक्ष समितीचे सदस्य संतोष शिंदे यांनी गेल्या काही वर्षामध्ये अनेक झाडे लावलेली आहेत. त्या झाडांचे संवर्धन त्यांनी स्वतः लक्ष घालून केलेले आहे. असे असतांना नगरसेवक बाळु खंदारे यांनी या परिसरात गटरचे काम करताना तेथील लावलेल्या झाडांची कोणतीही अडचण होत नव्हती.तरीही येथील झाडांची विनापरवाना बेसुमार कत्तल केली. तसेच पालिका प्रशासनाकडून झाडे तोडण्याबाबत रितसर परवानगी घेणे आवश्यक होते.मात्र तशी वृक्षतोड परवानगीही घेण्यात आलेली नाही. खंदारे यांनी परवानगी न घेता रेटुन, धाक, दाखवून वृक्ष तोडली असून त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संतोष शिंदे यांनी चौकशी केली असता पालिकेच्या वृक्ष विभागाकडून संबंधीतांनी वृक्षतोड परवाना घेतला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शनिवारी दि.३ रोजी वृक्ष तोडण्याची परवानगी घेतली नसतांना नगरसेवक बाळू खंदारे यांनी जेसीबीच्या सहाय्याने झाडे तोडण्यास सुरुवात केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत बातमीसाठी झाडे तोडत असतानाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली त्यावेळी चित्रीकरण करण्यास विरोध करतांनाच नगरसेवक बाळू खंदारे यांनी पत्रकार शिंदे यांना उद्धट वर्तन करत ‘तुला काय करायचे ते कर’,मी कायदा मोडणारा माणूस आहे’.अशी अशोभनीय भाषा वापरत झाडे तोडली. दरम्यान,पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही या बेकायदेशीर कामामध्ये वापरले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबतची माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना शिंदे यांनी दिली. मात्र कारवाई न करता मुख्याधिकारी बापट यांनी उडवाउडवीची उत्तरे देत या ज्वलंत प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.या सर्व घटनेची चौकशी करुन बेकायदेशीरपणे बेसुमार झाडे तोडून वृक्ष संवर्धन कायदा फाट्यावर मारणाऱ्या आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या नगरसेवकासह ठेकेदार आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संतोष शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!