सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कार्यक्रम व लग्नसोहळ्यातील नागरिकांच्या उपस्थितीवर निर्बंध असताना नागरिकांकडून सातत्याने या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रविवारी पालिका व पोलीस प्रशासाने संयुक्त मोहीम राबवून साताऱ्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमासह लग्नसोहळ्यावर कारवाई केली. क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास हजेरी लावल्याने संबंधितांकडून प्रति दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासानाकडून ठोस पावले उचलण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून लग्न सोहळा व सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली आहे. लग्नसोहळा व इतर कार्यक्रमासाठी केवळ पन्नास नागरिकांनाच जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आली आहे. असे असताना रविवारी दुपारी शाहूनगर येथे पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पन्नासहून अधिक नागरिकांनी हजेरी लावली. तर सदर बझार येथे पार पडलेल्या घरगुती विवाह सोहळ्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.सदर कार्यक्रमांत नियमांचे उल्लंघन केल्याने पालिका व पोलीस पथकाने संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. आयोजकांकडून प्रति दहा हजार असा एकूण वीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेचे कोरोना विभाग प्रमुख प्रणव पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
You must be logged in to post a comment.