हिंदवी स्कूलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने आणि श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये शाहूपुरी, सातारा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे नुकतेच उद्घाटन करण्याते आले.  यावेळी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी, श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे सचिव नानासाहेब कुलकर्णी, भारत भोसले, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव, सौ केंडे, मोहिते, वाहाळकर व मान्यवर उपस्थित होते.

शाहूपुरी येथील नागरिकांना लसीकरणासाठी कण्हेर आरोग्य केंद्र किंवा राजवाडा येथील कस्तुबा रुग्णालयात जावे लागत होते. गावातील नागरीकांना विशेषत: वयोवृध्द नागरीकांना हे खूपच त्रासदायक होत असे. मोठया लोकसंख्येचे गाव व ग्रामस्थांना होणारा त्रास विचारात घेवून शाहूपुरी येथे लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यासाठी नवनाथ जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

अमित कुलकर्णी यांनी हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देऊन हिंदवी स्कूल, शाहूपुरी येथे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या.  आरोग्य विभागामार्फत हिंदवी स्कूल, शाहूपुरी येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन अमित कुलकर्णी यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

error: Content is protected !!