लसीकरण केंद्रे प्राथमिक शाळांत स्थलांतरित करा : महेश शिंदे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यामध्ये स्वारस्य आहे. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी आहे. आरोग्य विभागाच्या सर्वच यंत्रणा एकाच छताखाली असल्याने, तेथे भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी असते, त्यातूनच कोरोना वाढत चालला आहे. कोरोना सुपर स्प्रेडर बनत असल्याने लसीकरण केंद्रे तातडीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित करावीत, अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.

कोरेगाव मतदारसंघातील कोरोनाविषयक भीषण परिस्थिती त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी सुनील खत्री, संतोष जाधव, राहुल प्र. बर्गे, माजी नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे उपस्थित होते.आ.शिंदे म्हणाले, विविध रुग्णालयांत उपचारार्थ दाखल होणार्‍या रुग्णांची माहिती घेतल्यावर, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रॅव्हल हिस्ट्री पाहिली तर त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतल्याचे स्पष्ट झाले. याबाबत शासनाच्या जबाबदार अधिकार्‍यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती विषद केली. मात्र, त्यांनी शासन निर्णयाकडे बोट दाखविले. त्यानंतर, मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगमध्ये हा विषय मांडला, त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे. मात्र, प्रशासन म्हणाव्या त्या पद्धतीने आणि अपेक्षित गतीने काम करत नाही.

error: Content is protected !!