सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून बुधवारी नवीन विक्रम नोंद झाला. एका दिवसांत जिल्ह्यात १ लाख ४४६३ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. राज्यात बुधवारच्या लसीकरणात मुंबईनंतर साताºयाचा दुसरा क्रमांक लागला आहे.
कोरोना विरुद्ध लस ही उत्कृष्ट आणि सुरक्षित शस्त्र ठरत आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात २० लाख ४६ हजार ९३० लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. यामध्ये बुधवारी देण्यात आलेल्या १ लाख ४ हजार ४६३ डोसचा समावेश आहे. बुधवारी एकूण ४६९ ठिकाणी लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ४४५ शासकीय केंद्रे होती. तर खासगी २४ ठिकाणी हा लस देण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख ६३ हजार १५० इतक्या संख्येने पहिला तर ५ लाख ८३ हजार ७८० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्ह्याला लस उपलब्ध होत आहे. त्याप्रमाणात आरोग्य विभागाच्या वतीने सर्वांना न्याय मिळेल अशा रीतीने शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रांना वाटप केले जात आहे. आरोग्य विभाग तसेच इतर कर्मचारी याबाबत काटेकोरपणे नियोजन करीत आहेत. तसेच लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यावरही विविध पातळ्यांवर भर दिला जात आहे.
अनेक ठिकाणी लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. ज्या ठिकाणी कमी प्रतिसाद आहे. तेथे घरोघरी प्रबोधन करण्यावर भर देण्यात येत आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, विस्ताराधिकारी तसेच यांच्यापैकी गावनिहाय विशेष नियुक्त पालक अधिकारी, कार्यक्रमासाठी काही गावांसाठी क्षेत्रीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यापासून ते गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वच स्तरातील कर्मचारी आणि अधिकारी यासाठी कष्ट घेत आहेत.
You must be logged in to post a comment.