बारामतीच्या खासगी सावकाराविरोधात गुन्हा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खटके वस्ती (ता. फलटण) येथील एकाला व्याजाने दिलेल्या अडीच लाख रुपयांचे आठ लाख सत्तर हजार रुपये घेऊनही आणखी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. यासाठी शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या बारामती येथील एका खासगी सावकाराविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश तुकाराम गावडे (रा. खटके वस्ती, ता. फलटण) यांनी संशयित आरोपी विकास धरमचंद रायसोनी (रा. वसंतनगर, बारामती, जि. पुणे) याच्याकडून २०१३मध्ये दरमहा तीन टक्के व्याजदराने घेतलेल्या २ लाख ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात २०१७मध्ये मुद्दल आणि व्याज असे एकूण ८ लाख ७० हजार रूपये म्हणजे चार वर्षांत मुद्दलाचे तिपटीपेक्षा जास्त पैसे रोख स्वरुपात दिले. त्यानंतरही आजपर्यंतच्या व्याजापोटी सावकार आणखी तीन लाख रुपये मागत होता. ते न दिल्यास कर्ज घेतेवेळी तारण म्हणून नावे करून दिलेली पवारवाडी गावच्या हद्दीतील गट नंबर २६३/१ मधील एक एकर जमीन पुन्हा माघारी न करण्याची धमकी गावडे यांना देत होता. यासाठी शिवीगाळ व दमदाटी करत असल्याने विकास रायसोनी याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक एस. व्ही. अरगडे करत आहेत.

error: Content is protected !!