धरण व्यवस्थापनाने काटेकोर नियोजन करावे : पालकमंत्री

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ना. शंभूराज देसाई यांचा आढावा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्ह्यात १६ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणासह प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. कोयना धरणात जवळपास १०० टीएमसी पाणी साठा झाला असून एकूण साठवण क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. सध्या धरणात ८१ हजार क्युसेक येवा होत असून पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजे ११ फूटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत. दुपारपासून विसर्ग ८० हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांवर विपरीत परिणाम होऊ नये, लोकांची गैरसोय टाळावी आणि धरण व्यवस्थापनाने विसर्गाचे काटेकोर नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील पर्जन्यस्थिती व संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता काटकर, कोयना धरण विभागाचे कार्यकारी अभियंता महेश राशणकर यांच्यासह महसूल व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहावे, पाण्यात जाण्याचे धाडस करू नये. पावसाचा जोर वाढल्यास व धरणातून विसर्ग वाढल्यास काही कुटुंबांना स्थलांतरित करावे लागेल, त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. स्थलांतरित कुटुंबांना सुरक्षित निवारा, अन्न, पाणी, औषधे व आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. कोयनानगर कॉलनीतील रिकाम्या क्वार्टर्सदेखील वापरासाठी तयार ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी आपल्या धरण कार्यस्थळावर थांबावे, कोणत्याही स्थितीत मुख्यालय सोडू नये. गावांचे संपर्क तुटू नयेत यासाठी पाणी आलेल्या रस्त्यांवर बॅरिकेटिंग करून सूचना फलक लावावेत. दरड कोसळल्यास वा झाडे उन्मळल्यास तातडीने जेसीबीच्या साहाय्याने मार्ग मोकळा करावा. वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनरेटर सेटची उपलब्धता ठेवावी. आरोग्य केंद्रांमध्ये साथीच्या रोगांवरील औषधे, अँब्युलन्स आणि सर्पदंशावरील लसी उपलब्ध असाव्यात. तसेच ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी 24×7 हजर राहतील याची दक्षता घ्यावी.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर व धबधब्यांवर गर्दी होत असल्याने तेथे पोलीस गस्त वाढवावी. धोकादायक भागात प्रतिबंधात्मक क्षेत्र आखून प्रवेशबंदी करावी. रस्त्यावर झाडे-झुडपे कोसळल्याने वा पाणी आल्याने अडथळे निर्माण झाल्यास तातडीने हटवावेत. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी. कोणत्याही परिस्थितीत लोकांची गैरसोय होऊ नये, हेच प्रशासनाचे ध्येय आहे, असेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

सद्यस्थितीत कोयना धरणात पाणीसाठा जवळपास पूर्ण क्षमतेजवळ पोहोचला असून उद्या जलपूजन करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील धरणांचा साठा, पाण्याचा येवा, विसर्ग तसेच पर्जन्यस्थितीचा आढावा सादर केला आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे सांगितले.

error: Content is protected !!