धैर्यशील कदमांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, भाजपमध्ये प्रवेश

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) कऱ्हाड उत्तरचे शिवसेनेचे नेते आणि औंध येथील वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी काल मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. कदम यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे मतदारसंघाच्या विकासकामांना निधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, माजी सहकारमंत्री यांच्या दबावामुळे शिवसेनेने त्यांना वाऱ्यावर सोडले. विकासकामांच्या अनेक फाईल बाजूला टाकल्या. त्यामुळे सत्ता असतानाही कदम यांची कोंडी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यावेळी त्यांनी आपली खदखद मांडली होती. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. राज्यात आता सरकार बदलले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष गोरे, खासदार निंबाळकर यांच्याशी कदम यांची जवळीक वाढली होती.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवबंधन तोडून श्री. कदम यांनी अखेर आज मुंबई येथे भाजप कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, रहिमतपूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश माने यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

error: Content is protected !!