जिल्हा बँक चांगल्या लोकांच्या हातात जावी : अजित पवार

खटाव, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘सर्वसामान्य जनतेची कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे कारखान्याकडे बोट दाखविण्यापेक्षा कोणाच्यात धमक आहे त्यांनी तो चालवायला घ्यावा. ऊठ-सूट इडीकडे जाणे आम्हाला जमत नाही,’ असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. तसेच जिल्हा बँकेची निवडणूक आहे. ही बँक चांगल्या विचारांच्या लोकांच्या हातात जावी, असेही स्पष्ट केले.

खटाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम व भव्य कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, इंदिरा घार्गे, सागर साळुंखे आदी उपस्थित होते.

.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘शेतकºयांच्या विविध प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादी करते. आजही शरद पवार यांच्या शब्दाला केंद्रात वजन आहे. त्यांच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर उभा करूया. आज राज्यात विविध प्रश्न भेडसावत आहेत. यातच कोरोनाचे संकट आहे. याही परिस्थितीत आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वारंवार इडीची भीती दाखवून कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होतो. परंतु काम करण्याची धमक असल्यामुळे ती पूर्णत्वास नेत आहोत.’

error: Content is protected !!