जिल्हा बँकेसाठी पुण्यात खलबते


सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी पुण्यात जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड सोसायटी मतदारसंघासाठी आग्रह धरला. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चार जागांची मागणी केली.

पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव अजितदादा या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे,  आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख उपस्थित होते.

यावेळी रामराजे यांनी जिल्हा बँकेच्या मतदार संघ निहाय आढावा घेतला. बैठकीत शिवेंद्रराजे यांनी सातारा मतदारसंघात मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे सातारा तालुक्यात चार जागांची मागणी केली. सातारा तालुक्‍यातील माझे मतदान पॅनलबरोबर राहील, असे शिवेंद्रराजेनी बैठकीतच जाहीर करुन टाकले. 

कराड सोसायटी मतदार संघातून उदयसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी या सोसायटी मतदार संघातूनच आपण लढणार असल्याचे सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी ठामपणे सांगितले. एवढेच नाही तर कराड तालुक्‍याचे मतदान जास्त आहे.  बँका, पतसंस्था मतदार संध तर मुळचा आमचाच आहे. या मतदारसंघासह महिला, मागास प्रवर्ग व एनटी हे मतदार संघ हे अन्य तीन मतदारसंघ मेरिटच्या निकषावर आम्हाला मिळाले पाहिजेत, अशी आग्रही भूमिका ना. बाळासाहेब पाटील यांनी घेतली.

error: Content is protected !!