सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जावळी सोसायटी मतदारसंघातून आमदार शशीकांत शिंदे संचालक आहेत. पण, यावेळेस याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आमदार शशीकांत शिंदेंपुढे अडचण निर्माण झाली आहे. रांजणेंचा अर्ज मागे घेण्यासाठी आता शिवेंद्रसिंहराजेंना तर दीपक पवारांचा अर्ज मागे घेण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मध्यस्थी करावी लागणार आहे. त्यावरच जावळी सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.
आता २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार शशीकांत शिंदेंनी पुन्हा स्वगृही जाऊन सातारा-जावळीतून लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी जावळीत पुन्हा मोर्चे बांधणी सुरू केली. त्यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदेंत कलगीतूरा रंगला होता. याच दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणुक लागल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आपले जावळी तालुक्यातील समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून तयार केले. त्यामुळे या दोन आमदारांतील वाद वाढला. एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत मजल गेली.
You must be logged in to post a comment.