सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने पालखी मार्गावरील गावांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून गावात कोरोनाची काय परिस्थिती आहे या बाबत विचारणा करण्यात आली असून त्याची माहिती आळंदी देवस्थानला द्यावी, असे पत्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्यावतीने पालखी मार्गावरील गावांचे सरपंच, नगराध्यक्ष व महापौर यांना पाठविले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीचे सावट आहे त्यामुळे वारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपुर्वी चैत्री वारीच्या निमित्ताने पालखी मार्गावरील गावांचा पाहणी दौरा होत असतो. या दौऱ्यात मुक्कामाची ठिकाणे, रस्त्याची परिस्थिती, आरोग्य, पाणी पुरवठा, वीज आदीं सुविधांचा आढावा घेतला जातो. तसेच चैत्र शुध्द दशमीला पंढरपूर येथे आळंदी संस्थान, मानकरी, दिंडी समाज व फडकरी यांची बैठक होवून या बैठकीत वारीच्या वाटचाली बाबत विचार विनीमय होत असतो. तिथीची वृध्दी किंवा क्षय झाला तर मुक्कामाची ठिकाणे, वाढीव मुक्काम यावरही महत्वपुर्ण चर्चा बैठकीत होत असते. परंतु गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी पायी वारी झाली नाही. मागील वर्षी पंढरपूर येथील आषाढीवारी साठी सर्व संतांच्या पालख्या राज्य शासनाने विशेष बसने पंढरपूरला आणल्या होत्या आणि आषाढी वारी साजरी झालेली होती. त्यावेळी सर्वत्र कोरोनाची भयावह स्थिती होती. राज्यातील शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून यायचे.
आता गेल्या वर्षभरातील कोरोनाची स्थिती पाहिली तर कोरोना आता शहरात कमी आणि ग्रामीणमध्ये अधिक वाढू लागला आहे. त्यामुळे यंदा पायी वारी करायची की गतवर्षी प्रमाणे यंदाही सर्व संतांच्या पालख्या विशेष बस द्वारे थेट पंढरपुरला न्यायच्या या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्रत्येक गावची कोरोना परिस्थिती जाणून घेण्यासाठीच हा पत्रव्यवहार केला जात आहे. पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार यंदा २ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. तथापि कोरोना संदर्भात सध्या चालू असलेले लसीकरण, कोरोना बाबत समाजामध्ये झालेली जागृती, प्रतिबंधात्मक उपाय योजना संदर्भात दिली जाणारी माहिती या नुसार सदर परिस्थितीचा विचार करता यंदाच्या पालखी सोहळ्या संदर्भात भूमिका जाणून घेण्याचा हेतू आहे. आषाढी पायी वारी दरम्यान कोरोनाच्या फैलावा संदर्भातील सध्याची परिस्थिती व सोहळयाचा मुक्काम आपल्या गावी असेल त्यावेळेची व संभाव्य परिस्थिती याचा साधक – बाधक विचार करता आषाढी वारीचे स्वरूप यंदा कसे असावे. या संदर्भात आपले मत व भूमिका आपण संस्थान कमिटीस तात्काळ लेखी कळवावे अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
पत्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून बंद असलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का ? कोरोनाच्या प्रादुर्भावा संदर्भात आपल्या कार्यक्षेत्रातील आजची परिस्थिती नेमकी काय आहे ? यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का ? सोहळया मधील वारकरी भाविकांची संख्या किती असावी ? किती संख्ये पर्यंत वारकरी आपल्या गावाच्या कार्यक्षेत्रात येणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणास योग्य व सुरक्षित वाटते ? मुक्कामाच्या तळावर आपण कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकता ? यासंदर्भातील मत व भूमिका आपण संस्थान कमिटीस पत्राद्वारे कळविल्यास त्यानुसार संस्थांनला सर्व संबंधितांशी चर्चा विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेणे, तसेच या संदर्भात शासन संस्थेची संवाद साधून आषाढी वारीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
You must be logged in to post a comment.