सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील फेरीवाले-हातगाडीधारक यांची तात्काळ नोंदणी करून राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज सर्वसामान्य फेरीवाले-हातगाडीधारक यांच्यापर्यंत पोहचवण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सातारा शहरातील फेरीवाले-हातगाडीधारक यांची आजपर्यत नोंदणी केलेली व परवाने दिलेल्या लोकांची यादी जाहीर करून ज्या फेरीवाले-हातगाडीधारक लोकांची नोंद पालिका प्रशासनाने केली नाही. ज्या लोकांना परवाने दिले नाही. त्यांची तात्काळ नोंद करून त्यांना राज्य शासनाने जाहीर केलेले प्रत्येकी १५०० रु.चं पॅकेज सर्वसामान्य फेरीवाले-हातगाडीधारक यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी यासाठी पालिका प्रशासनाने मोहीम हाती घ्यावी. कोरोनाच्या संकटामुळे मुळातच सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे. यामुळे लोकांचे खूप हाल होत आहेत. यातून लोकांना दिलासा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोंदणीकृत फेरीवाले -हातगाडीधारक यांना प्रत्येकी १५०० रु पॅकेज जाहीर केले आहे. ही समाधानाची बाब आहे .
परंतु पालिकेच्या यादी मध्ये किती नोंदणीकृत परवानाधारक फेरीवाले-हातगाडीधारक आहेत याची माहिती लोकांना नाही.त्याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे आणि ज्या लोकांची नोंदणी झाली नाही त्या लोकांची नोंदणी तात्काळ होणे गरजेचे आहे.
राज्य शासनाच्या पॅकेज पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबींचा गांभीर्य पूर्वक विचार करून यावर योग्य ती कार्यवाही करून सातारा शहरातील एकही फेरीवाला-हातगाडीधारक राज्य शासनाच्या पॅकेज पासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेवटी निवेदनात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, उपाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, संदीप कांबळे, सचिव गणेश भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
You must be logged in to post a comment.