‘मागेल त्याला रेशनिंग’ देण्याची वंचितची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : टाळेबंदीमुळे सरकारने रेशनिंगवर सर्वांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. मात्र, रेशनिंग दुकानदार जर बारा अंकी नंबर असेल तरच धान्य मिळेल अन्यथा धान्य नाही या भूमिकेत आहेत. जर अशी अटकळ घातली तर सर्वसामान्य नागरिकांना रेशनिंग कधी मिळणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील वर्षी टाळेबंदी असतांना कोणतीही अट घालण्यात आली नव्हती त्याप्रमाणेच सध्याही मागेल त्याला रेशनिंगचे धान्य वाटप करावे.तसेच जिल्हा प्रशासनाने तातडीने याप्रश्नी लक्ष घालून सर्वसामान्यांचा ज्वलंत प्रश्न निकाली काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा सचिव गणेश भिसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतावर कोरोनाचे संकट गेल्या एकवर्षांहून जास्त काळ देश,राज्य, जिल्हा यांना सतावत आहे.कोरोनाची पहिली लाट मागील वर्षाच्या सुरुवातीला आली लाट रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊनची भुमीका केंद्र सरकारने मार्चच्या मध्यावधीला घेतली व जवळपास तीन महिने पूर्ण टाळेबंदी नंतर जून नंतर हळू हळू जनजीवन सुरळीत करण्यासाठी टाळेबंदी मधील निर्बध शिथिल करण्यात आले. सप्टेंबर अखेर पूर्ण निर्बध शिथिल करण्यात आले.खऱ्या अर्थाने लोक कामासाठी भित भित का होईना बाहेर पडू लागले.तीन महिने होत नाही तोपर्यंत याही वर्षीच्या सुरुवातीला कोरोनाची दुसरी लाट देशात आली आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला तो महाराष्ट्राला पर्यायाने आपल्या सातारा जिल्ह्याला.यामुळे महाराष्ट्र सरकारने टाळेबंदीची घोषणा केली व ती अजून चालू आहे.टाळेबंदी , कडक निर्बंध या मध्येच लोकांचे 18 महिन्यातील अर्ध्याहुन जास्त काळ गेला आहे.

केंद्र सरकारने एक देश एक कार्ड ही घोषणा करून लोकांना अजून काम लावले. रेशनिंग कार्डला आधार लिंक करणे यासाठी केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाच्या 24 डिसेंबर 2019 रोजी अधिसूचना काढण्यात आली व देशातील नागरिकांना 31 मार्च 2021 रोजी अखेर रेशनिंगकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत देण्यात आली.ज्या लोकांचे रेशनिंग कार्ड आधार कार्डशी लिंक नाहीं अशा लोकांना रेशनिंग मिळणार नाही जर रेशनिंग कार्डवर 12 अंकी नंबर असेल तरच लोकांना रेशनिंग मिळणार आहे यामुळे कोरोनाच्या या महाभयंकर परस्थितीमध्ये लोकांची अवस्था ‘आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे.लोकांना टाळेबंदीमुळे कामही करता येईना आणि सरकार रेशनिंग पण देईना (सर्वांना मोफत धान्य) ही घोषणा करूनही स्वतःसहित मुले-बाळे कशी जगवायची असा प्रश्न लोकांच्या समोर आहे.रेशनिंग दुकानदार जर 12 अंकी नंबर असेल तरच धान्य मिळेल अन्यथा नाही या भूमिकेत आहे.मागील वर्षीच्या टाळेबंदी मध्ये 12 अंकी नंबर नसतानाही लोकांना धान्य देण्यात आले परंतु या वर्षीच्या टाळेबंदीमध्ये 12 अंकी नंबर असेल तरच धान्य मिळेल अशी परिस्थिती आहे.यामुळे रेशनिंग विभाग कागदी घोडे कधीपर्यंत नाचवणार ? कामातील हलगर्जीपणा कधी थांबवणार ? सर्वसामान्य नागरिकांना रेशनिंग कधी मिळणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केले तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा सचिव गणेश भिसे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!