सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटर व सिव्हिल हॉस्पिटल येथे बसवण्यात आलेली ऑक्सिजन यंत्रणा तपासण्यात येऊन या यंत्रणेचे विशेष तंत्रज्ञांच्यामार्फत ऑडिट व्हावे, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आज नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे झालेल्या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमध्ये जवळपास २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ही अतिशय वाईट घटना आहे. यासंदर्भात नाशिक प्रशासनाचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. मात्र नाशिकमध्ये घडलेल्या घटनेची राज्यात कुठेही पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.
नाशिक येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील सातारा जिल्हा जम्बो कॉविड सेंटर व सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथील बसवण्यात आलेली ऑक्सिजन टॅंक आणि। त्याअनुषंगाने कार्यान्वित असलेली तत्सम यंत्रणा तपासण्यात यावी.तसेच सदरच्या यंत्रणेचे विशेष तंत्रज्ञांच्या मार्फत ऑडिट व्हावे. त्याचबरोबर अचानकपणे जर ऑक्सिजन यंत्रणेला प्रॉब्लेम आलाच तर दुसरी ऑक्सिजन यंत्रणा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असावी जेणेकरून जीवितहानी टळेल यासाठीची तयारी प्रशासनाने अगोदरच करावी अशा मागण्या वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत.
You must be logged in to post a comment.