उदयनराजेंना निवडून द्या.., कामाचं आमच्यावर सोडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वाई, खंडाळा, महाबळेश्वरच्या जनतेला आवाहन

वाई,(भूमिशिल्प वृत्तसेवा): संपूर्ण जगात दमदार नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. काहीही झालं तरी आपल्याला जिंकायचं आहे. उदयनराजे यांना निवडून द्या.., कामाचं आमच्यावर सोडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ केलेल्या जाहीर सभेचे बोलत होते. याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आमदार देवयानी फरांदे,भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, दत्तानाना ढमाळ, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमित कदम, किसनवीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, लोकसभा निवडणूक संयोजक सुनील काटकर, माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील, महाबळेश्वरचे माजी सभापती संजय गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, माजी उपसभापती विजय नायकवडी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर, राजेंद्र लवंगारे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अजितदादा पवार म्हणाले, छत्रपती  शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती १२ बलुतेदारांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याच मराठ्यांच्या गादीचे वारस खासदार उदयनराजे भोसले हे आहेत. शिवरायांच्या विचाराचं राज्य चालवण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींनी  पाकिस्तानची नांगी जिरवली. हा देश परत भारताच्या वाटेला गेला नाही. 

उदयनराजे भोसले म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी शेतकरी, जवान, महिला ,गोरगरीब यांच्यासाठी योजनांची घोषणा करून पोत्याने मते घेतली, मात्र विकासाच्या बाबतीत जनतेला वाऱ्यावर सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी जनतेच्या हितासाठी प्रवाहासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर त्यांना गद्दार ठरवले गेले. कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही. भविष्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघांमध्ये अनेक प्रकल्प आणले जाणार आहेत. स्ट्रॉबेरी ,आले ,हळद संशोधन केंद्र वाई येथे उभारण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत क्षेत्र महाबळेश्वर, मांढरदेवी यांचा विकास आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. महाबळेश्वर ,पाचगणी, वाई या नगरपालिकांना जो काही निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून लागेल तो मंजूर करण्याचं काम माझं राहील.  प्रतापगड वर रोपवे करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. जनतेने विकास करणाऱ्यांसोबत राहावं.

आमदार मकरंद पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालकीचे दोन कारखाने कर्जातून बाहेर काढण्यासाठी अजित दादांच्या सोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. शासनाने कारखान्यांना ५०० कोटींची थकहमी दिलेली आहे. गेल्या अजितदादांनी तब्बल एक हजार कोटी रुपये मतदार संघाच्या विकासासाठी दिले. मतदारसंघातील जनतेसाठी आपण महायुती सोबत असून खासदार उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करूया. जनतेच्या कामासाठी मी खंबीर आहे, त्यासाठी कोणाच्या दारात जायची गरज नाही, असे देखील आमदार मकरंद पाटील यांनी ठणकावले.

..तर पवाराची अवलाद सांगणार नाही

खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते नितीन पाटील यांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी आपल्या भाषणात केली, तोच धागा पकडत अजित दादांनी नितीन काकांना नक्की खासदार करू. वाई मतदारसंघातून उदयनराजेंना एक लाखाचं मताधिक्य दिलं तर जूनमध्ये नितीन काकांना राज्यसभेवर घेऊ, अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही, असे अजित दादा म्हणाले.

मोदी करतात ते येड्या गबाळ्याचं काम नाही..

रशियाने युक्रेन वर हल्ला केला, तेव्हा भारतातील वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध थांबवायला लावले. ही सर्व मुले स्पेशल विमानाने भारतात परतल्यानंतर पुन्हा युद्ध सुरू झाले,अशी आठवण सांगत अजितदादांनी मोदी करतात ते काम येड्या गबाळ्याला शक्य नाही, असे सांगितले.

चव्हाण साहेबांना भारतरत्न मिळवणारच..

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, याची मागणी उदयनराजे यांनी केलेली आहे. माझ्या जाहीरनाम्यात देखील ही मागणी आहे. चव्हाण साहेबांना हा पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही अजितदादांनी सांगितले.

आजारी कारखाने बाहेर काढू..

वाई खंडाळा महाबळेश्वर येथील जनतेच्या आग्रहाखतर किसनवीर भुईंज व खंडाळा हे दोन आजारी कारखाने ताब्यात घेतले. या कारखान्यावर सुमारे एक हजार कोटींचे कर्ज आहे. या दोन्ही कारखान्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत करण्याची हमी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिलेले आहे त्यामुळे हे आजारी कारखाने प्रगतीच्या पथावर आणू, असा विश्वासही अजित दादांनी व्यक्त केला.

आलेली वरात इकडून तिकडे चालणार नाही

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वाईमध्ये सभा झाली. त्या सभेत आपल्याकडील काही मंडळी त्यांच्या स्टेजवर पाहायला मिळाली. स्वातंत्र्य दिलं म्हणून स्वैर आचार करण्याची मुभा आपल्या पक्षात कोणालाच नाही. आपण एका विचाराने एकत्र आलेले लोक आहोत. आलेली वरात इकडून तिकडे चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत कोणीही वाकडं पाऊल टाकायचं नाही, असा दमच आमदार मकरंद पाटील यांनी विरोधी भूमिका घेतलेल्या कार्यकर्त्यांना दिला.

error: Content is protected !!