साताऱ्याच्या धैर्या कुलकर्णीने केला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर

१२ व्या वर्षी पालकांशिवाय बेस कॅम्प सर करणारी धैर्या देशातील पहिली मुलगी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, हे आव्हानात्मक स्वप्न अनेकांचे स्वप्नच राहते. हे स्वप्न सत्यात उतरवण्याची गौरवास्पद कामगिरी येथील धैर्या विनोद कुलकर्णी हिने केली आहे. तीही वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी. इतक्या कमी वयात पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या देशातील पहिली मुलगी ठरली आहे.

एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणे हे एक मोठे आव्हान असते. तेही ‘एव्हरेस्ट’समच. जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत या चतुसूत्रीने एव्हरेस्ट शिखर सर करणारे अनेकजण आहेत. कित्येक वर्षे त्यासाठी मेहनत घेतली जाते. एव्हरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी सर्वाधिक महत्वाचे असते, ते एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरीत्या पूर्ण करणे. कारण, भल्याभल्यांनाही हा कॅम्प पूर्ण करताना दमछाक होते, तर अनेकांना कॅम्प अर्धवट सोडून पाठिमागे वळावे लागते.धैर्या कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्याने सातारा जिल्ह्यासह परिसरातील अनेक ठिकाणांनी ट्रेक पूर्ण केले. कैलास बागल यांचे प्रशिक्षण तिला सातत्याने ऊर्जा देत राहिले, तर सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, पॅनेलप्रमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, आई शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांची प्रेरणा तिला बळ देत राहिली.

एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी धैर्याने एव्हरेस्टकन्या प्रियंका मोहिते, गिर्यारोहक गगन हल्लुर यांचे मार्गदर्शन घेतले. हा कॅम्प ५५४५ मीटर इतका उंचीचा आहे. धैर्याने दररोज १० ते १५ किलोमीटर असे चालत तब्बल १४ दिवसांमध्ये १३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तोही मायनस १० डिग्री तापमानामध्ये. आई-वडिल सोबत नसताना अवघ्या १२ वयाच्या मुलीने बेस कॅम्प पूर्ण करणे हे एकमेव उदाहरण ठरले आहे. धैर्या येथील गुरुकूल स्कूलमध्ये इयत्ता ६ वीमध्ये शिक्षण घेत आहेत. तिच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

…म्हणून जीवाचे रान

एव्हरेस्ट बेस कॅम्प ही मोहीम जगभरातील अनेकांची आवडती गिर्यारोहण मोहीम असते. दरवर्षी जगभरातून हजारो गिर्यारोहक आपल्या शारीरिक क्षमतेचा कस आजमावण्यासाठी काठमांडूत जमा होतात. येथून पुढे एव्हरेस्ट ज्या ठिकाणाहून दिसतो, त्याचे दर्शन घेण्यासाठी त्या सर्वोच्च शिखराच्या पायथ्याशी चालत जाणे, हे एक ध्येय असते. त्यासाठी बेभरवशी निसर्गाबरोबरच जाणाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी लागते. कमी ऑक्सिजन व उंचावरील विरळ हवेत होणारे विलक्षण शारीरिक आजार या सर्वांचा सामना करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभागी गिर्यारोहक जीवाचे रान करत असतात.

परीक्षेतही ‘सरावाची परीक्षा’ पास

कु.धैर्या ही वयाच्या पाचव्या वर्षापासून छोटेमोठे ट्रेक करत आहे. सह्याद्रीतील अनेक गडकिल्ले व डोंगर जंगलांतील गिर्यारोहण मोहिमांत तिने सहभाग घेतला आहे. आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी ती अपार कष्ट घेते. धैर्याने अजिंक्यातारा, यवतेश्वर, जरंडेश्वर याठिकाणी कसून सराव केला. शाळेची वार्षिक परीक्षा असतानाही तिने सरावात खंड पडू दिला नव्हता. या मोहिमेसाठी मार्चपासून तिने कसून सराव केला आहे.

धैर्या साहसी आहे. वयाच्या ६ व्या वर्षापासून ते ट्रेकींग करते. प्रचंड जिद्दी असलेल्या धैर्याला आई-वडिलांचे पाठबळ मिळत आहे. परीक्षा कालावधीतही तिने सराव सोडला नाही. पहाटे उठून दररोज तास-दीड तास तिने सराव केला. जिद्द, तीव्र इच्छाशक्ती, मेहनत या बळावर तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला. धैर्याचे अभिनंदन.

  • कैलास बागल, प्रशिक्षक, सह्याद्री ट्रेकिंग.
error: Content is protected !!