आरक्षणासाठी जावली तहसील कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा

जावली,(भूमिशिल्प वृत्तसेवा): धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, तसेच आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने जावली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. दरम्यान “धनगर आरक्षण आमच्या हक्काचे”, “येळकोट येळकोट जय मल्हार” आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी धनगर समाजाचे नेते प्रवीण काकडे, शिवाजीराव गोरे, विलास शिंदे, राजू गोरे, रोहित ढेबे, प्रकाश खरात, अशोक शेडगे, करण आखाडे, प्रकाश आखाडे, कोंडीबा शिंदे, प्रकाश शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ७५ वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. शासनाने अनेक वेळा आश्वासने देऊन धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आता तरी आम्हाला न्याय देऊन धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करावी. जातनिहाय जनगणना करण्यात यावी. मेढा शहरात नवीन बस स्थानक परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव्यास असणाऱ्या शेतकऱ्यांची जनावरे चरण्यासाठी काही जमीन गायरान क्षेत्र म्हणून शासन दरबारी नोंद करण्यात यावी. वन्य प्राण्यांकडून होणारे हिंस्रक हल्ले व शेतीचे होणारे नुकसान याबाबत वन विभागाने तात्काळ शासकीय मदत देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटींचा निधी देण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतीगृह उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याप्रसंगी संतोष ढेबे, समीर झोरे, लक्ष्मण आखाडे, जयराम काळे, विशाल शिंदे, भगवान आखाडे, भागोजी पाटील, सचिन झोरे, कृष्णकांत शिंदे, गणपत ढेबे आदी उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. आमच्या मुलांच्या भविष्यासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.

error: Content is protected !!