
सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नुकत्याच पार पडलेल्या सातारा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर विजयी नगरसेवकांना देण्यात आलेली विजयाची अधिकृत प्रमाणपत्रे ‘हरवले’असल्याची चर्चा सध्या नगरपालिका आणि राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. या प्रकारामुळे प्रशासनासह राजकीय पातळीवरही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, महत्त्वाच्या टप्प्यावर ही बाब गांभीर्याने पाहिली जात आहे.
मतमोजणी पूर्ण होऊन निकाल अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयी उमेदवारांना दिले जाणारे विजय प्रमाणपत्र हे नगरसेवकाच्या निवडीचा कायदेशीर पुरावा असते. या प्रमाणपत्राच्या आधारेच नगरसेवक कार्यभार स्वीकारू शकतात तसेच नगरपालिकेतील सभा, समित्या आणि इतर सर्व प्रक्रियांमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतात. त्यामुळे अशा अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत गोंधळ निर्माण होणे ही बाब प्रशासनाच्या दृष्टीनेही गंभीर मानली जात आहे.
सातारा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षांसह एकूण ५० जागांपैकी ४० नगरसेवक आणि नगराध्यक्ष भाजपाचे, ९ अपक्ष आणि १ शिवसेना (शिंदे गट) असा निकाल लागला आहे. ही निवडणूक खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या साविआ व नवीआ या दोन्ही आघाड्यांचे विसर्जन करून भाजपाच्या कमळ चिन्हावर लढविण्यात आली होती. तिकीट वाटपात असंतोष झाल्याने अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातून नऊ अपक्ष उमेदवार विजयी झाले, तर दहा जागांवर भाजपाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.
निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांच्या भेटी घेत पाठिंब्याची भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीपूर्वी अपक्षांसाठी राजकीय दारे बंद असल्याचे नेत्यांकडून जाहीर करण्यात आले होते; मात्र निकालानंतर परिस्थिती बदलली असून नऊ अपक्षांपैकी सात नगरसेवकांनी खासदार उदयनराजे भोसले यांना, तर दोन नगरसेवकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे दोन्ही बाजूंचे संख्याबळ वाढले असून गटबांधणीच्या हालचालींना वेग आला आहे.याच राजकीय घडामोडींच्या धावपळीत काही नगरसेवकांची विजय प्रमाणपत्रे कुठे गेली, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. प्रमाणपत्रे हरवली की कुणाकडे राहून गेली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी संबंधित नगरसेवकांकडून प्रमाणपत्रांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काही नगरसेवक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची, तर हरवलेले प्रमाणपत्र शोधण्यासाठी जाहिरात द्यावी की इनाम जाहीर करावे, अशी नर्मविनोदी, खुसखुशीत चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा पदग्रहण समारंभ होत आहे. त्यानंतर येत्या आठवड्यात पहिली सर्वसाधारण सभा होणार असून यामध्ये उपाध्यक्ष निवड आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम होणार आहे. अशा निर्णायक टप्प्यावर काही नगरसेवक पदग्रहण कार्यक्रमाला जावे, की हरवलेली प्रमाणपत्रे शोधावीत, अशा संभ्रमात असल्याचे चित्र दिसून येत आहे. विजय प्रमाणपत्रासारख्या अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर कागदपत्रांबाबत निर्माण झालेला हा गोंधळ प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर मानला जात असून, यामुळे सातारा नगरपालिकेतील पुढील कारभार आणि सत्तासमीकरणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
You must be logged in to post a comment.